सीबीडी बेलापूर पोलिसांकडून मुख्य आरोपी तेजस डाकीसह साथीदारांवर कारवाई; १५ गुंतवणूकदारांची फसवणूक
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील विंधणे, वशेणी आणि पुनाडे परिसरात स्वस्त दरात मोकळे भूखंड देण्याचे आमिष दाखवून १५ गुंतवणूकदारांना तब्बल ५७ लाख ३६ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी तेजस डाकी व त्याच्या इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘लँडलॉर्डस् रिअलटर्स’चा बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी जून २०२२ मध्ये सीबीडी बेलापूर परिसरात ‘मे. लँडलॉर्डस् रिअलटर्स’ नावाचे कार्यालय थाटले होते. या कंपनीच्या माध्यमातून उरणमधील विंधणे, वशेणी आणि पुनाडे येथील जमिनींची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आली होती. आकर्षक जाहिरातींना भुलून अनेक नागरिकांनी प्लॉट खरेदीसाठी या कंपनीशी संपर्क साधला.
पैसे घेतले, पण प्लॉट दिलाच नाही
आरोपींनी गुंतवणूकदारांकडून जमिनीच्या मोबदल्यात लाखो रुपये उकळले. मात्र, दीर्घकाळ उलटूनही गुंतवणूकदारांना ना जमिनीचा ताबा मिळाला, ना त्यांचे पैसे परत मिळाले. वारंवार पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. अखेर या प्रकरणातील १५ पीडित गुंतवणूकदारांनी एकत्र येत पोलिसांत धाव घेतली.
फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची नावे:
पुष्करसिंग रावत, प्रवीण चंदनशिव, प्रदीप भाटकर, सुनील वाडकर, कांतीलाल पटेल, गौरव वरसोलकर, राजिंदर सिंग, हफिज अन्सारी, मनोज होळकर, नानी मंडल, तुकाराम ढेपे, सचिन शहाणे, सुनील शेट्टी व इतर.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
उरण तालुक्यात सध्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याचाच फायदा घेत बनावट टोळ्या सक्रिय झाल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणत्याही जमिनीचे व्यवहार करताना कागदपत्रांची शहानिशा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सीबीडी बेलापूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू केला आहे.
