म्हसळा: रायगड जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण उलथापालथ पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिंदेसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता काबीज केली आहे. या अनपेक्षित युतीमुळे तटकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, जिल्ह्याच्या राजकारणात आता ‘म्हसळा पॅटर्न’ची चर्चा रंगू लागली आहे.
तटकरेंचा फोटो हटवला; बदलाचे वारे
सत्ता स्थापन होताच नगरपंचायत कार्यालयातून खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवण्यात आला असून, त्या जागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. हा बदल केवळ प्रशासकीय नसून तो एक प्रबळ राजकीय संदेश असल्याचे मानले जात आहे.
व्हीप झुगारून बंडखोरी
नगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांसाठी व्हीप जारी केला होता. खुद्द सुनील तटकरे यांनी बंडखोरांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता, मात्र तरीही स्थानिक समीकरणांपुढे पक्षादेशाचा जोर चालला नाही. शिंदे गटाने काँग्रेसच्या साथीने बहुमताचा आकडा गाठत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला सुरुंग लावला.
विजयाचा जल्लोष आणि राजकीय संघर्ष
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. स्थानिक पातळीवरील नाराजी आणि पदवाटपातील जुन्या मतभेदांमुळेच हे नवे समीकरण जुळून आल्याचे बोलले जात आहे.
