• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांचा ‘शिमगा’; माणगावमध्ये ६ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

ByEditor

May 11, 2026

रखडलेल्या बायपासचा प्रवाशांना फटका | उन्हात तासनतास अडकल्याने लहान मुले, ज्येष्ठांचे हाल

माणगाव । सलीम शेख
कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांना आणि चाकरमान्यांना रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने ही परिस्थिती ओढवली असून, संतप्त प्रवाशांनी महामार्गावरच शासन आणि ठेकेदाराच्या नावाने ‘शिमगा’ साजरा करत तीव्र संताप व्यक्त केला.

पाच ते सहा किलोमीटरचे ‘पार्किंग’

कोकण व तळकोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांचा प्रचंड ओघ एकाच वेळी महामार्गावर आल्याने माणगाव परिसरात वाहतूक व्यवस्था कोलमडली. माणगावपासून महाडच्या दिशेला सुमारे ६ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये खासगी कार, एसटी बस आणि मालवाहू गाड्यांचा समावेश होता. कडक उन्हात तासनतास अडकून पडल्यामुळे प्रवाशांना पाणी, अन्न आणि प्रसाधनगृहांच्या समस्येला सामोरे जावे लागले. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल झाले.

पोलिसांची दमछाक

वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी माणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस उन्हाची तमा न बाळगता रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी वाहतूक वळवून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र वाहनांची संख्या इतकी मोठी होती की प्रशासनाचे सर्व प्रयत्न तोकडे पडले.

ठेकेदार बदलले, पण काम जैसे थे

स्थानिक नागरिकांच्या मते, माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम पूर्ण झाले असते, तर ही कोंडी टाळता आली असती. या कामासाठी आजवर अनेक ठेकेदार बदलण्यात आले, मात्र कामाची गती मंदावलेलीच आहे. सणासुदीच्या काळात किंवा सुट्ट्यांमध्ये या महामार्गावर ही कायमची समस्या बनली आहे.

“बायपासचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही कोंडी सुटणार नाही. सरकार केवळ घोषणा करते, पण जमिनीवर परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. प्रवाशांच्या सहनशीलतेचा आता अंत होत आहे.”स्थानिक नागरिक व प्रवासी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!