अलिबाग : पाली नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक १३ आणि १४ साठी पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार येत्या २० जून रोजी मतदान पार पडणार असून २१ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या घोषणेमुळे पाली शहरातील राजकीय वातावरणात आता हालचालींना वेग आला आहे.
या निवडणुकीसाठी सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून, पाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल कराळे यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार, सोमवार दिनांक १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र पाली नगरपंचायत कार्यालयात दाखल करता येतील. मात्र, २३ आणि २४ मे रोजी शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दाखल अर्जांची छाननी २६ मे रोजी सकाळी ११ वाजता केली जाईल. त्यानंतर २७ मे ते २ जून या कालावधीत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. जर अर्जाबाबत कोणतेही अपील नसेल, तर २ जून रोजी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अपील असल्यास ही प्रक्रिया ११ जूनपर्यंत पूर्ण केली जाईल.
आवश्यकता भासल्यास शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीची मतमोजणी रविवार दिनांक २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुधागड-पाली तहसील कार्यालयातील हिरकणी कक्ष येथे होणार आहे. पोटनिवडणुकीचा अधिकृत निकाल २३ जून रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.
