• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोलादपूर नगरपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २० जून रोजी मतदान

ByEditor

May 11, 2026

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या प्रभाग क्रमांक १ साठी पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार, येत्या २० जून रोजी मतदान होणार असून २१ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल. जिल्हा प्रशासनाकडून हा कार्यक्रम जाहीर होताच पोलादपूरमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनय शिपाई हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार, सोमवार दिनांक १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. पोलादपूर तहसील कार्यालयात हे अर्ज दाखल करावे लागतील. मात्र, २३ मे (शनिवार) आणि २४ मे (रविवार) या सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी मंगळवार दिनांक २६ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून केली जाईल.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ मे ते २ जून २०२६ या कालावधीत (दुपारी ३ वाजेपर्यंत) असेल. जर अर्जाबाबत कोणतेही अपील नसेल, तर २ जून रोजी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जाबाबत न्यायालयात अपील असल्यास ही प्रक्रिया ११ जूनपर्यंत पूर्ण केली जाईल.

आवश्यकता भासल्यास शनिवार दिनांक २० जून २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. त्यानंतर रविवार दिनांक २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून पोलादपूर तहसील कार्यालयात मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीचा अंतिम निकाल २३ जून रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोलादपूरमधील प्रभाग क्रमांक १ च्या या लढतीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!