म्हसळा (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. प्रचंड सत्तासंघर्षानंतर अवघ्या चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी विराजमान झालेले शिवसेनेचे (शिंदे गट) शाहीद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला दिला होता धक्का
गेल्या दहा वर्षांपासून म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वर्चस्व होते. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १७ पैकी ९ जागा जिंकून शिवसेनेने राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावली होती. शाहीद जंजीरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव करून नगराध्यक्षपद मिळवले होते. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मिळवलेला हा विजय राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात होता.
फोटो प्रकरणावरून तापले होते राजकारण
सत्तांतर झाल्यानंतर नगराध्यक्षांच्या दालनातून खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवण्यात आला होता. त्याऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे फोटो लावण्यात आले होते. या घटनेनंतर म्हसळ्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. त्यातच राष्ट्रवादीने आपल्या नगरसेवकांना ‘व्हीप’ बजावत कारवाईचा इशाराही दिला होता.
राजीनाम्यामागे ‘सुनील तटकरेंची गुगली’?
शाहीद जंजीरकर यांनी आपण कोणत्याही दबावाखाली नसून स्वखुशीने राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले असले, तरी यामागे वरिष्ठांचा दबाव की खासदार सुनील तटकरे यांची राजकीय खेळी, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. महायुतीमधील अंतर्गत समीकरणे जुळवण्यासाठी वरिष्ठांकडून काही सूचना आल्या होत्या का? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
आगामी संघर्षाचे संकेत
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुका आणि स्थानिक वर्चस्व टिकवण्यासाठी ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून अवघ्या चार दिवसांत पायउतार व्हावे लागल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची शांतता आहे, तर राष्ट्रवादी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. आता म्हसळ्याच्या नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
