नागोठणे (प्रतिनिधी) : नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाक पानसरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी उद्या, मंगळवार दिनांक १२ मे रोजी निवडणूक होत आहे. मात्र, या निवडीपूर्वीच नागोठणे सरपंचांसह शिवसेना ठाकरे गटाच्या बहुतांश सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केल्याने या निवडणुकीला आता विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. बदललेल्या या सत्तासमीकरणानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण नागोठणेकरांचे लक्ष याकडे लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच नागोठणेच्या सरपंचांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे संख्याबळ आणि ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अखलाक पानसरे यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
निवडणूक कार्यक्रम आणि वेळ
मंगळवारी सकाळी १०:३० वाजल्यापासून ‘बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालय’ येथील कै. शैलेंद्र विजय देशपांडे सभागृहात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. सकाळी ११:३० पर्यंत अर्ज स्वीकारले जातील, तर १२:३० पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. दुपारी १:०० वाजता विशेष सभेमध्ये नवीन उपसरपंचांची निवड जाहीर केली जाईल.
