• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा -उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

ByEditor

May 11, 2026

रोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

रोहा (प्रतिनिधी): रोहा शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

डॉ. सी. डी. देशमुख सभागृह, रोहा येथे आयोजित कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, रोहा-अष्टमी नगर परिषद नगराध्यक्षा कु. वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती विजया पाशिलकर, उपसभापती संजय मांडलुस्कर, मुरुड नगराध्यक्षा दांडेकर, मुख्याधिकारी अजयकुमार एडके आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या की, विकास म्हणजे केवळ सिमेंटच्या इमारती अथवा रस्ते नव्हेत, तर सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे होय. श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन आणि रोजगार यांचा समतोल राखून विकास साधण्यास शासन प्राधान्य देत आहे. कोकणातील नागरिक मेहनती, प्रामाणिक व कष्टाळू असून कोकणाचा विकास हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी सांगितले.

रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पावन भूमी असून सामाजिक समतेचा इतिहास घडविणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाचीही ही भूमी आहे. कोकण हा निसर्गसंपन्न, सांस्कृतिक वैभव लाभलेला प्रदेश असून येथील विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहा-अष्टमी नगर परिषद हद्दीतील कुंडलिका नदीकाठावर विविध ठिकाणी पुरसंरक्षक भिंती बांधणे, कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे खाऊ गल्ली विकसित करणे, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स यांनी तयार केलेले शिवसृष्टी शिल्प उभारणे, धावीर महाराज मंदिर येथे भक्तनिवास नूतनीकरण करणे तसेच स्वर्गीय दत्ताजीराव ग. तटकरे ब्लड बँक विकसित करणे आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय अजितदादा यांच्या कार्याचा उल्लेख करताना, दर्जेदार विकासकामे करण्यावर त्यांचा नेहमी भर होता, असे सांगितले. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील सुमारे 12.30 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आज होत असल्याचे त्यांनी नमूद केले. रायगड व कोकणाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार सुनील तटकरे यांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या विकासदृष्टीचा उल्लेख करताना, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकासाला गती देण्याचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!