• Tue. May 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुरुडमध्ये जमीन वादाला गुन्हेगारीचे वळण; २० कोटींच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल

ByEditor

May 12, 2026

“PIL मागे घे, नाहीतर कंपनी संपवून टाकीन”; रेवदंडा पोलिसांत गुन्हा दाखल

रेवदंडा । सचिन मयेकर
मुरुड तालुक्यातील मौजे मांडला येथील जमिनीच्या व्यवहारातून तब्बल २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. “उच्च न्यायालयातील जनहित याचिका (PIL) मागे घ्या, अन्यथा कंपनीची वाट लावीन,” अशी धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील विक्रोळी (पश्चिम) येथील रहिवासी आणि ‘आर.टी. दायकॉन डिझाईन अँड बिल्ड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.’ कंपनीशी संबंधित अयुब हमीद खान (वय ६५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मांडला येथील जमिनीच्या व्यवहारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मागे घेण्यासाठी आणि कंपनीकडून सुरू असलेल्या नदीवरील पुलाच्या बांधकामात अडथळा न आणण्यासाठी आरोपीकडून पैशांची मागणी केली जात होती.

फिर्यादीनुसार, आरोपीने सुरुवातीला २ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी डिसेंबर २०२५ मध्ये मुरुडमधील एका हॉटेलमध्ये २५ हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारले. त्यानंतर ११ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा २५ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ठराविक रक्कम घेऊनही आरोपीचे समाधान झाले नाही. त्याने थेट २० कोटी रुपयांच्या अवाढव्य रकमेची मागणी करत, “पैसे दिले नाहीत तर हातपाय तोडून फेकून देईन आणि कंपनीची वाट लावीन,” अशा शब्दांत खान यांना धमकावले. अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून अयुब खान यांनी पोलिसांत धाव घेतली.

रेवदंडा पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०८(२), ३०८(५) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव करीत आहेत.

या घटनेमुळे मुरुड-मांडला परिसरातील जमीन व्यवहार आणि विकासकामांच्या आड सुरू असलेल्या खंडणीखोर प्रवृत्तींवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!