• Tue. May 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचा प्रवास आता अधिक सुरक्षित; ९३.५६ कोटींच्या जेट्टीचे उद्या लोकार्पण

ByEditor

May 12, 2026

खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा; कोकणच्या पर्यटन विकासाला नवी गती

अलिबाग । अमुलकुमार जैन
अरबी समुद्राच्या लाटांवर आजही अभेद्य उभ्या असलेल्या ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचा प्रवास आता पर्यटकांसाठी अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ योजनेंतर्गत मुरूड-राजपुरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रवासी जेट्टी आणि ‘ब्रेकवॉटर’ प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी (दि. १३ मे) सकाळी ११.३० वाजता होणार आहे. तब्बल ९३.५६ कोटी रुपये खर्चून उभारलेला हा प्रकल्प रायगडच्या सागरी पर्यटनासाठी एक मैलाचा दगड मानला जात आहे.

धोकादायक प्रवासातून पर्यटकांची सुटका

जंजिरा पाहण्यासाठी दरवर्षी देश-परदेशातून लाखो पर्यटक येतात. मात्र, राजपुरी किनाऱ्यावरून बोटीने किल्ल्यापर्यंत जाताना भरती-ओहोटी आणि समुद्रातील उंच लाटांमुळे पर्यटकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असे. पावसाळ्यात किंवा खराब हवामानात हा धोका अधिक वाढायचा. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य शासनाने येथे ब्रेकवॉटर (लाटा प्रतिबंधक भिंत) आणि आधुनिक जेट्टी उभारण्याचा निर्णय घेतला होता. दोन महिन्यांपूर्वीच हे काम पूर्ण झाले असून, आता पर्यटकांच्या सेवेसाठी हे दालन खुले होत आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ

या प्रकल्पाचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील तटकरे असतील. या सोहळ्याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या सुविधेमुळे केवळ सुरक्षा वाढणार नाही, तर स्थानिक बोट व्यावसायिक, हॉटेल उद्योग आणि गाईड्सच्या व्यवसायालाही मोठी उभारी मिळणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये एका नजरेत:

एकूण खर्च: ९३.५६ कोटी रुपये.

ब्रेकवॉटरचा फायदा: समुद्रातील लाटांचा थेट फटका बसणार नाही; बोटींचे पार्किंग आणि ये-जा सुरक्षित होणार.

आधुनिक जेट्टी: जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी बोटीत चढणे-उतरणे अधिक सुलभ.

पर्यटन वृद्धी: सुरक्षित प्रवासामुळे वर्षभरातील पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता.

“कोकणातील सागरी पर्यटनाला जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जंजिरा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपतानाच पर्यटकांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.”
— प्रशासन

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!