उरण । घनश्याम कडू
न्हावा शेवा बंदर परिसरात कंटेनरमधील माल चोरी करणारे रॅकेट पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बेंगलोरहून थेट अमेरिकेला एक्स्पोर्ट करण्यासाठी आणलेल्या एका बंद कंटेनरमधून तब्बल १३ लाख ५६ हजार ५७७ रुपयांचे १,१७० लेडीज ड्रेस भररस्त्यात लंपास करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कंटेनरचे सील न तोडता हा माल गायब करण्यात आल्याने लॉजिस्टिक क्षेत्रातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात चालक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालक कंटेनर टाकून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘शाही एक्स्पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीने तयार केलेले लेडीज ड्रेस अमेरिकेतील ‘गोलमार्ट’ कंपनीला पाठवले जाणार होते. एकूण ५४८ कार्टून बॉक्समध्ये पॅक केलेला हा माल बेंगलोरच्या पिनिया फॅक्टरीमधून न्हावा शेवा बंदरात आणण्याची जबाबदारी ‘ओम लॉजिस्टिक सप्लाय चेन’ कंपनीकडे होती. त्यासाठी पूजा ट्रान्सपोर्टचा २० फुटी बंद कंटेनर ट्रेलर भाड्याने घेण्यात आला होता.
वजन कमी भरल्याने चोरी उघड
११ मे रोजी चालक केंम्पाहीय्या जी. हा कंटेनर घेऊन बेंगलोरहून निघाला आणि १३ मे रोजी उरणमधील सोनारी गावातील ‘स्पिडी सीएफएस यार्ड’मध्ये पोहोचला. मात्र, यार्डमध्ये मालाची तपासणी करताना काही कार्टून बॉक्सचे वजन कमी भरल्याने कस्टम आणि यार्ड प्रशासनाला संशय आला. सर्व बॉक्स उघडून पाहिले असता, १९७ कार्टूनमधून तब्बल १,१७० लेडीज ड्रेस गायब असल्याचे उघड झाले.
जीपीएस ट्रॅकिंगमुळे संशय बळावला
चोरी उघडकीस आल्यानंतर चालकाचा मोबाईल बंद येत होता आणि तो कंटेनर यार्डमध्येच सोडून पसार झाला होता. कंपनीने तात्काळ कंटेनरमधील जीपीएस (GPS) सिस्टीम तपासली. तेव्हा १३ मे रोजी हा कंटेनर उरणमधील द्रोणागिरी परिसरातील भैरीदेवी मंदिराजवळील भेंडखळ रोडवर काही वेळ संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. याच ठिकाणी चालकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने कंटेनरचे लॉक किंवा सीलशी छेडछाड करून माल चोरल्याचा संशय आहे.
मोठ्या रॅकेटची चर्चा
कंटेनर सुरक्षित आणि सील असतानाही आतील लाखो रुपयांचा माल गायब कसा होतो? या टोळ्यांना मार्गात नेमके कोणाचे संरक्षण मिळते? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. सध्यातरी फिर्यादी सचिन सत्यनारायण शर्मा यांच्या तक्रारीवरून न्हावा शेवा पोलिसांनी चालक केंम्पाहीय्या जी. आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी दीपक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जयकर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
