उरण । घनश्याम कडू
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. सेक्टर ५० मधील एका बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ५ लाख ५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे द्रोणागिरी आणि उरण परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, द्रोणागिरी येथील सेक्टर ५० मधील ‘हरीसखा अपार्टमेंट’च्या फ्लॅट क्रमांक ८०३ मध्ये सुनंदा धर्मराज कडू (वय ५५) या आपल्या पतीसह राहतात. बुधवारी (१३ मे) कडू दांपत्य घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी नेमकी याच संधीचा फायदा उठवला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कडू दांपत्य घरी परतले असता, त्यांना मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला आणि दरवाजा अर्धवट उघडा होता. घरात प्रवेश करून पाहिले असता बेडरूममधील कपाट उघडून चोरट्यांनी आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचे समोर आले, तर कपाटातील नकली दागिने चोरट्यांनी जमिनीवर फेकून दिले होते.
या धाडसी चोरीमध्ये ३ तोळ्यांचा सोन्याचा कंठीहार, ५ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, सोन्याची अंगठी, सोन्याच्या कुड्या, चांदीचे पैंजण, जोडवे आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी सुनंदा कडू यांच्या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी हनिफ दस्तगीर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश गोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, द्रोणागिरी व उरण परिसरात वाढत्या घरफोड्यांच्या सत्रामुळे स्थानिक रहिवाशांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या घरफोडी करणाऱ्या टोळ्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
