महाड | मिलिंद माने
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील शिंदे कोंड गावाजवळ रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. एका भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकी आणि दुसऱ्या एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. या विचित्र अपघातात दुचाकीस्वारांसह चौघेजण गंभीर जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१७ मे) सायंकाळी ५:३५ वाजण्याच्या सुमारास शिंदे कोंड गावाच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. दिव्यांश शरद शहा (वय ३७, रा. हैदराबाद) हा आपल्या ताब्यातील बीएमडब्ल्यू कार (क्र. MH-03-BW-8735) मुंबईच्या दिशेने भरधाव व बेदरकारपणे चालवत होता. दरम्यान, या कारने समोर असलेल्या एनटॉर्क स्कुटी (क्र. MH-08-BL-3643) आणि टोयोटा ईटीऑस कार (क्र. MH-03-AZ-7369) या दोन्ही वाहनांना पाठीमागून भीषण धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार शुहेब लियाकत चिकटे (वय ३३, रा. कलकाई कोंड, दापोली, रत्नागिरी), वली अब्दुल वहाब मोहीमतुले (वय २५, रा. कलकाई कोंड, दापोली, रत्नागिरी), कारमधील प्रवासी प्रणाली सदाशिव परब (वय ३०, रा. भांडुप, मुंबई) व प्रयाग सिद्धार्थ साळवी (वय ३०, रा. भांडुप, मुंबई) हे जखमी झाले असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
अपघाताची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या प्रकरणी निष्काळजीपणे व बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल बीएमडब्ल्यू कार चालक दिव्यांश शहा याच्याविरुद्ध महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
