• Mon. May 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेवदंड्यात अवैध सावकारीचा विळखा; महिलांच्या माध्यमातून छळवणूक!

ByEditor

May 18, 2026

गरिबांच्या अश्रूंवर उभी राहतायत पैशांची साम्राज्ये; महिलांकडून धमकावून वसुली होत असल्याची चर्चा

अलिबाग | विशेष प्रतिनिधी
रेवदंडा आणि परिसरात सध्या बेकायदेशीर व्याजी पैशांच्या (सावकारी) व्यवहारांनी भीषण स्वरूप धारण केले असून, यामुळे सर्वसामान्यांचे जिणे असह्य झाले आहे. अचानक आलेली आर्थिक अडचण, आजारपण, घरगुती संकट किंवा व्यवसायातील तोटा यांमुळे पैशांची गरज भासणाऱ्या गरजू नागरिकांना काही पांढरपेशा टोळ्या आपल्या जाळ्यात ओढत असल्याची धक्कादायक चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

विशेष म्हणजे, या काळ्या धंद्यात केवळ स्थानिकच नव्हे, तर बाहेरून येणाऱ्या काही लोकांचाही वावर वाढला आहे. सुरुवातीला अत्यंत सहज आणि “ताबडतोब पैसे” देण्याचे आमिष दाखवले जाते. मात्र, एकदा माणूस जाळ्यात अडकला की वाढते हप्ते, व्याजावर व्याज आणि सततच्या वसुलीचा ससेमिरा मागे लावून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

मौल्यवान वस्तू तारण; वसुलीसाठी महिलांचा वापर?

काही प्रकरणांमध्ये दुचाकी वाहने, मालमत्तेची कागदपत्रे किंवा सोन्या-चांदीचे दागिने तारण ठेवून हे व्यवहार होत आहेत. वेळेत पैसे न दिल्यास शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, सार्वजनिक ठिकाणी तमाशा करून बदनामी करणे तसेच वाहने बळजबरीने ताब्यात घेण्याचे प्रकार वाढले आहेत. अत्यंत चिंतेची बाब म्हणजे, काही प्रकरणांमध्ये थेट महिलांना पुढे करून त्यांच्यामार्फत धमकावत हप्त्यांची वसुली केली जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

परिसरातील केळकर स्टॉप, मुख्य बाजारपेठ तसेच काही आडमार्गांवर या व्यवहारांची केंद्रे सुरू असून, दिवस-रात्र चालणाऱ्या या संशयास्पद हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच भागात काही ठिकाणी बेकायदा विमल-गुटख्याची जादा दराने विक्रीही जोरात सुरू आहे.

संसार कोलमडले, आत्महत्येचा वाढता धोका

गरिबांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन सुरू असलेल्या या काळ्या बाजारातून दिवसागणिक लाखोंची उलाढाल होत आहे. सततचा आर्थिक ताण आणि मानसिक दबाव यामुळे परिसरातील अनेक कुटुंबांचे संसार कोलमडले आहेत. या व्याजाच्या छळाला कंटाळून काही जण गाव सोडून पळून गेले आहेत, तर काही जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या मानसिकतेत आहेत. यापूर्वीही परिसरात कर्जबाजारीपणामुळे काही आत्महत्यांच्या घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. पैशांच्या सततच्या तगाद्यामुळे अनेक तरुण चोरी, मारामारी किंवा इतर गैरप्रकारांकडे ढकलले जात असल्याची भीतीही व्यक्त होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी लक्ष देण्याची मागणी

रेवदंडा आणि परिसरात वाढता मानसिक छळ आणि बेकायदेशीर उलाढाल रोखण्यासाठी रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या अवैध सावकारी आणि गुटखा विक्रीची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आर्त हाक त्रस्त नागरिकांनी प्रशासनाला दिली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!