टोल वसुली तात्काळ थांबवा, अन्यथा नाक्यावर धडकणार; एनएचएआय प्रशासनाला दिले निवेदन
धाटाव | शशिकांत मोरे
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास आलेले नाही. अनेक ठिकाणी रस्त्याची व पुलांची कामे प्रलंबित आहेत, तसेच या मार्गाचे अधिकृत उद्घाटनही झालेले नाही. असे असतानाही ‘भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण’ (NHAI) कडून या मार्गावर टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. या अन्यायकारक टोल वसुलीला ‘रायगड प्रेस क्लब’ने तीव्र विरोध दर्शवला असून, ही वसुली तात्काळ न थांबवल्यास टोल नाक्यावर थेट आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चारपदरी व सुसज्ज व्हावा यासाठी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून, ज्येष्ठ पत्रकार व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने लढा दिला जात आहे. अनेक आंदोलने आणि पाठपुराव्यामुळेच या रस्त्याच्या कामाला गती मिळाली होती. सध्या रस्ता बऱ्यापैकी तयार झाला असला, तरी नागोठणे, कोलाड यांसह विविध ठिकाणी अजूनही पुलांची आणि रस्त्यांची कामे सुरूच आहेत.
काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू केल्याने नागरिकांमधून आणि वाहनधारकांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पनवेल येथील कार्यालयात अधिकार्यांना निवेदन देऊन टोल वसुली तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष विजय मोकल, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय माजी सचिव अनिल भोळे, खजिनदार भारत गोरेगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र मोरे, दिनेश सुतार, पनवेल महानगर प्रेस क्लबचे तालुकाध्यक्ष प्रशांत शेडगे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
“ज्या रस्त्याच्या पूर्णत्वासाठी आम्ही १७ वर्षे संघर्ष केला, तो रस्ता अजूनही अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू असताना आणि अधिकृत उद्घाटनही झाले नसताना टोल वसुली सुरू करणे म्हणजे सर्वसामान्यांची लूट आहे. ही टोल वसुली तात्काळ थांबवावी, अन्यथा रायगड प्रेस क्लब टोल नाक्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.”
— प्रशांत गोपाळे (अध्यक्ष, रायगड प्रेस क्लब)
