कोलाड उड्डाणपुलाच्या रचनेबाबत प्रवाशांमधून संताप; मातीच्या ढिगाऱ्यांमुळे वाहने आदळण्याचे सत्र सुरूच
कोलाड | विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वरसगाव-भिरा फाट्यावर दिशादर्शक आणि सूचना फलक नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि महामार्ग प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे येथे एखाद्या प्रवाशाचा नाहक बळी गेला, तर याला संबंधित ठेकेदार आणि अधिकारीच सर्वस्वी जबाबदार असतील, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी व स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड बाजारपेठेत सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी मुख्य मार्ग सुमारे ५०० मीटर अंतरावर वरसगाव फाट्याजवळ बंद करण्यात आला असून, त्या ठिकाणी रस्त्यावर मातीचे मोठे ढिगारे टाकून ठेवले आहेत. मात्र, या ठिकाणी वाहनचालकांना पूर्वकल्पना देणारा कोणताही दिशादर्शक, परावर्तक (रिफ्लेक्टर) किंवा सूचना फलक लावण्यात आलेला नाही. परिणामी, रात्रीच्या वेळी अचानक समोर येणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यांचा अंदाज न आल्याने वाहने थेट त्यावर जाऊन आदळत आहेत. काल रात्रीच एक अर्टिगा कार अशाच प्रकारे मातीच्या ढिगाऱ्यावर चढली; सुदैवाने या अपघातात चालक थोडक्यात बचावला. या ठिकाणी असे अपघात रोजचेच झाले आहेत.
पुलाच्या चुकीच्या रचनेमुळे सर्व्हेवर प्रश्नचिन्ह
मुंबई-गोवा हायवेवर अनेक छोट्या गावांच्या सोयीसाठी उड्डाणपूल किंवा अंडरपास बनवण्यात आले आहेत. मुरुड-भिरा मार्गावरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील भिरा फाट्यावर उड्डाणपूल किंवा अंडरपास असणे अत्यंत गरजेचे होते. कोलाडपासून बनवण्यात येत असलेला उड्डाणपूल भिरा फाट्याच्या पुढे नेणे आवश्यक होते, जेणेकरून भिरा मार्गाकडील वाहतुकीला अडथळा झाला नसता. “हायवेच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदाराने भिरा फाट्याचा सर्व्हे डोळे मिटून केला होता का?” असा संतप्त सवाल आता प्रवासी करत आहेत.
निकृष्ट गतिरोधक ठरतायत अपघाताचे कारण
गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. आता कुठे काम अंतिम टप्प्यात येत असल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. हा वेग नियंत्रित करण्यासाठी वरसगाव येथे जे गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवले आहेत, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. योग्य रचनेअभावी हे गतिरोधकच आता अपघातांना निमंत्रण देत आहेत.
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल अशी डेडलाईन दिली होती, पण सद्यस्थिती पाहता काम पूर्ण होण्याची कोणतीही खात्री नाही. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर भिरा फाट्यावर वाहनांचा वेग आणखी वाढेल. येथे खरं तर ‘अंडरपास’ रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. प्रशासनाने ते केले नाही, पण आता अपघात टाळण्यासाठी येथे तातडीने ब्लिंकिंग सिग्नल (पिवळे लुकलुकणारे दिवे) लावण्यात यावेत. तसेच, गेल्या वर्षभरापासून बसवलेले पण अद्याप बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत, अन्यथा हायवे अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात तीव्र पाऊल उचलावे लागेल.”
-विश्वास बागुल (कुणबी समाज युवा कार्यकर्ते, वरसगाव)
