पेण | विनायक पाटील
सोशल मीडियावरून महिलेचा विनयभंग करून, तिच्यासह कुटुंबाची बदनामी करत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत आरोपीला पेण पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. हेमंत अरुण पलीये (वय ४०, रा. उमरेड, जि. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे हिमगौरी हॉटेल (ता. पेण, जि. रायगड) येथे २६ ते २७ मार्च २०२६ दरम्यान ही घटना घडली होती. आरोपी हेमंत पलीये याने कोणत्याही कारणाशिवाय फिर्यादी महिला, तिचे होणारे पती आणि हॉटेल मालक यांची सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक बदनामी केली. आरोपीने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आणि मेसेजद्वारे महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे अत्यंत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केले होते. याप्रकरणी २८ मार्च २०२६ रोजी पेण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(१), ७९, ३२६ सह माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम २००० चे कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना देत होता चकवा!
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत त्याच्या नागपूर येथील पत्त्यावर आणि मोबाईलवर वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, आरोपी तपासात सहकार्य न करता, पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन स्वतःचे अस्तित्व लपवत फिरत होता. पेण पोलिसांच्या पथकाने त्याचा नागपूर, सातारा आणि इतर विविध भागात शोध घेतला, परंतु तो सतत चकमा देत होता.
तांत्रिक विश्लेषणाने आवळल्या मुसक्या
आरोपी पोलिसांना सापडत नसल्याने अखेर पेण पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने त्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले. त्यावरून आरोपी उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्ह्यात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पेण पोलिसांचे पथक तात्काळ उत्तर प्रदेशला रवाना झाले. तेथे बिसरक पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने अत्यंत शिताफीने शोध घेऊन १४ मे २०२६ रोजी रात्री २३:३९ वाजता आरोपी हेमंत पलीये याला ताब्यात घेण्यात आले.
उत्तर प्रदेशात अटक केल्यानंतर आरोपीला सूरजपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने १५ मे ते १८ मे २०२६ पर्यंत ट्रान्झिट वॉरंट मंजूर केल्यानंतर पोलीस पथकाने त्याला महाराष्ट्रात आणले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला १९ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी रायगडच्या पोलीस अधीक्षक श्रीम. आंचल दलाल मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धडक कारवाईत पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, राजेश पाटील, सहायक फौजदार अमित कवळे तसेच पोलीस अंमलदार अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हसकोटी, सुशांत भोईर, अमोल म्हात्रे, शैलेश कदम, सागर खांडस्कर, गोविंद तलवारे, भाऊराव पाटील, विजय बोंद्रे, संदीप शिंगाडे आणि राजेश्वर अंकमवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
“नागरिकांना कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज, सोशल मीडियावरील त्रास किंवा सायबर गुन्ह्यांसंबंधी काहीही तक्रार असल्यास, त्यांनी न घाबरता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.”
— पोलीस निरीक्षक, पेण पोलीस ठाणे
