पनवेल तहसील कार्यालय पुन्हा बदनाम; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) धडक कारवाई
रायगड | अमुलकुमार जैन
सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ३५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी गोवर्धन माने याला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. पनवेलमधील तक्का परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या खळबळजनक कारवाईमुळे पनवेल तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
१ लाखाची मागणी, ३५ हजारांवर तडजोड
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पनवेल परिसरातील स्वतःच्या मालकीच्या जागेचा सातबारा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी मंडळ अधिकारी गोवर्धन माने याने सुरुवातीला चक्क एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणाऱ्या या अधिकाऱ्यासोबत तक्रारदाराने वाटाघाटी केल्यानंतर अखेर ही रक्कम ३५ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.
‘एसीबी’चा तक्का परिसरात यशस्वी सापळा
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने नोव्हेंबर महिन्यात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली होती. ‘एसीबी’च्या पथकाने तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या पडताळणी केली. त्यानंतर आज पनवेलमधील तक्का परिसरात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच, दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने गोवर्धन माने याला रंगेहाथ पकडले.
महसूल विभागाचा कारभार पुन्हा ऐरणीवर
पनवेल तहसील कार्यालय हे यापूर्वीही विविध कारणांमुळे आणि गैरव्यवहारांमुळे चर्चेत राहिले आहे. आज झालेल्या या धडक कारवाईमुळे महसूल विभागातील ‘टेबलाखालची’ देवाणघेवाण आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काच्या कामासाठी अशा प्रकारे लाच द्यावी लागत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी आरोपी गोवर्धन माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रायगड एसीबीचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. तसेच माने याच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
