कोलाडमध्ये विराट हिंदू संमेलनाला प्रचंड गर्दी; ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात वज्रमूठ आवळण्याचे आवाहन
कोलाड | विश्वास निकम
“आपल्याला कपाळावरचा गंध, मंदिरावरचा कळस, अंगणातील तुळस, घरातील माय आणि गोठ्यातील गाय सुरक्षित ठेवायची असेल, तर सर्व हिंदूंनी जातीपाती विसरून एकत्र येण्याची नितांत गरज आहे,” असे परखड मत प्रसिद्ध कीर्तनकार हभप गौरीताई सांगळे यांनी व्यक्त केले. सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने आयोजित भव्य विराट हिंदू संमेलनात मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. या संमेलनाला कोलाड आणि खांब परिसरातील हजारो हिंदू बांधव आणि महिला भगिनींनी अभूतपूर्व गर्दी केली होती.

पुढे बोलताना गौरीताई म्हणाल्या, “नात्यांचा आदर कसा करायचा, माता-पित्यांच्या चरणी कसे नतमस्तक व्हायचे, हे संस्कार फक्त हिंदू धर्मच शिकवतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन मातीतील आणि ३२ मणांचे सुवर्ण सिंहासन असलेल्या रायगड जिल्ह्यातील वारसदार आहोत, याचा अभिमान प्रत्येकाने बाळगायला हवा.” तसेच, सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत त्यांनी माता-भगिनींना आपल्या मुलींवर योग्य संस्कार करण्याचे आणि तरुण मुलींनी ‘लव्ह जिहाद’सारख्या छुप्या संकटांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
रायगड जिल्हा ही महाराष्ट्राची अयोध्या: सौरभ करडे

यावेळी हिंदू व्याख्याते सौरभ करडे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “मी हिंदू संमेलनांच्या निमित्ताने अनेक जिल्हे फिरलो, परंतु कोलाडमधील हा विराट जनसमुदाय सर्वात मोठा आणि अभूतपूर्व आहे. ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोलाडमध्ये येणे हे माझे भाग्य आहे. जिजाऊ माता आणि शिवरायांच्या या भूमीत भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम आहे. म्हणूनच रायगड जिल्हा ही महाराष्ट्राची अयोध्या आहे.”
जातीपाती बाजूला ठेवून वज्रमूठ आवळा: अध्यक्ष राजेश गांधी
सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीचे अध्यक्ष राजेश गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाच्या एकजुटीवर भर दिला. “जोपर्यंत आपण जातीपातीत विखुरलेले आहोत, तोपर्यंत आपल्याला कमकुवत समजले जाईल. आज कोलाड पंचक्रोशीने एकत्र येत आपली ताकद काय आहे, हे दाखवून दिले आहे. आपल्यासमोर उभे ठाकलेले लव्ह जिहाद, बेकायदेशीर धर्मांतर आणि देवस्थानांवर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी सकल हिंदू म्हणून वज्रमूठ आवळणे हीच काळाची गरज आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
वारकऱ्यांच्या दिंडीने सोहळ्याचा प्रारंभ
कार्यक्रमाची सुरुवात कोलाड परिसरातील वारकऱ्यांच्या विलोभनीय दिंडी प्रदक्षिणेने झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफूल बेटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रार्थना प्रसन्न बेटकर यांनी प्रभावीपणे सांभाळले. संपूर्ण कोलाड परिसर भगवामय झालेल्या या विराट संमेलनाची सांगता अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात राष्ट्रगीताने करण्यात आली.
