• Tue. May 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; पुन्हा एकदा ‘राजकीय ट्विस्ट’?

ByEditor

May 19, 2026

४ महिन्यांत लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग; १ जून रोजी रंगणार रणसंग्राम

म्हसळा | वैभव कळस
म्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानाची तारीख निश्चित झाली असून, तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील सत्तासंघर्ष विकोपाला गेल्यापासून या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चार महिन्यांत लागोपाठ चार वेळा निवडणूक लागल्याने यावेळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आणि नगराध्यक्षपदाचा चेहरा कोण असणार, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत म्हसळा नगरपंचायत सभागृहात पार पडणार आहे. इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र म्हसळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल करावे लागणार असून, दि. २२ मे रोजी अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर दि. २५ मे रोजी नामनिर्देशन पत्र फेटाळलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील. पीठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यासाठी दि. २६ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली असून, याच दिवशी वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल.

निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. २७ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून, अंतिम उमेदवारांची यादी दि. २९ मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हसळा नगरपंचायत अध्यक्षपदासाठीची विशेष निवडणूक सभा दि. १ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली असून, याच सभेत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे व त्यानंतर तात्काळ निकाल जाहीर केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे १ जून रोजी म्हसळ्याच्या सत्तेची चावी कोणाच्या हातात जाणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!