लगतची दुकाने आणि हॉटेल थोडक्यात बचावली; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये संताप
म्हसळा । वैभव कळस
येथील दिघी नाक्यावरील पोलीस चौकीच्या मागील बाजूस असलेल्या पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या आवारात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र, म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय कर्णिक यांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे अग्निशमन दलाने वेळेत आग आटोक्यात आणली, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने सध्या ढगाळ वातावरण असल्याने आणि प्रखर ऊन नसल्याने आगीचे लोळ फारसे भडकले नाहीत. आग लागल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी विठ्ठल राठोड आणि नगरसेवक संजय कर्णिक यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण केले. अग्निशमन जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात यश आले.
घटनास्थळाला लागूनच ‘विहान हॉटेल’, सायबर कॅफे आणि अनेक महत्त्वाची दुकाने आहेत. ही आग जर रात्रीच्या वेळी लागली असती, तर ही सर्व दुकाने क्षणात भस्मसात झाली असती आणि मोठी जीवित व वित्तहानी झाली असती, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
पाटबंधारे विभागाच्या आवाराला अवकळा; टवाळखोरांचा अड्डा?
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड घाण आणि अडगळ साचलेली आहे. तसेच, या आवारातील सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या इमारतीच्या पायऱ्यांवर दिवस-रात्र टवाळखोरांचे टोळके बसलेले असते. येथे सर्रासपणे सिगारेट आणि अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या आवाराला ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी अवस्था प्राप्त झाली असून, सिगारेटच्या थोटकामुळेच ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
कार्यालयाच्या आवाराची स्वच्छता
आग आटोक्यात आल्यानंतर नगरसेवक संजय कर्णिक आणि मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी नगरपंचायतीच्या स्वच्छता कामगारांना पाचारण करून तत्काळ या कार्यालयाच्या आवारातील सर्व अडगळ आणि कचरा साफ करून घेतला.
शहरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो, नगरसेवक संजय कर्णिक आणि मुख्याधिकारी विठ्ठल राठोड हे नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मात्र, भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून पाटबंधारे विभागाने आपल्या आवाराची सुरक्षा आणि स्वच्छता राखावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
