म्हसळा पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधील ५ आरोपींना रोहा येथून अटक
रायगड । अमूलकुमार जैन
कमी किमतीत सोन्याचे खरे दागिने देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात रायगड पोलिसांना मोठे यश आले आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी केसाराम सावजी बागरी (वय ४७, मूळ रा. राणीवाडा, जि. जालोर, राजस्थान, सध्या रा. किल्ला, ता. रोहा, रायगड), मोहनलाल गंगाराम परमार (वय ४२, मूळ रा. जालोर, राजस्थान, सध्या रा. किल्ला, ता. रोहा, रायगड), राजु शिलाराम राठोड (वय २७, रा. भीमनाल, जि. जालोर, राजस्थान), अनिल हरिराम परमार (वय २६, रा. डकात्रा, जि. जालोर, राजस्थान) आणि जितेंद्रकुमार मोहनलाल परमार (वय २७, रा. डकात्रा, जि. जालोर, राजस्थान) या पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी आरोपींनी फिर्यादीला बाजारभावापेक्षा कमी दरात खरे सोन्याचे दागिने देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने आरोपींना १५ लाख रुपये दिले. मात्र, आरोपींनी प्रत्यक्षात बनावट दागिने देऊन रक्कम घेतली आणि तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून म्हसळा पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता, हा गुन्हा पूर्वनियोजित कट रचून केल्याचे समोर आले. या टोळीतील काही जणांनी फिर्यादीशी व्यवहार केला, तर इतरांनी त्यांना पळून जाण्यास मदत केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढत अखेर किल्ला (ता. रोहा) येथून या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
या कारवाईनंतर रायगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अज्ञात व्यक्तींकडून मिळणाऱ्या स्वस्त सोन्याच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये. सोन्याची खरेदी नेहमी अधिकृत आणि विश्वासू ज्वेलर्सकडूनच करावी आणि अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद विचारणा किंवा फसवणूक झाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या आंतरराज्यीय टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, म्हसळा पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
