• Sat. May 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुठवली गावच्या विनीत कापसेची ‘इस्रो’ भेटीसाठी निवड!

ByEditor

May 23, 2026

द. ग. तटकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश; ४ जूनला बंगळुरूकडे रवाना होणार

कोलाड । विश्वास निकम
येथील द. ग. तटकरे विद्यालयाचा इयत्ता नववीचा विद्यार्थी विनीत विशाल कापसे याची भारताची नामांकित अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ (ISRO) भेटीसाठी निवड झाली आहे. विनीतच्या या ऐतिहासिक यशामुळे कापसे मुठवली गावासह संपूर्ण कोलाड आणि रोहा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत विनीतने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे घवघवीत यश संपादित केले. संपूर्ण रायगड जिल्ह्यातून केवळ चार विद्यार्थ्यांची या विशेष मोहिमेसाठी निवड झाली असून, त्यात विनीतने आपले स्थान निश्चित केले आहे.

विनीत कापसे याला लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राची प्रचंड आवड आहे. याच आवडीमुळे त्याने यापूर्वी कोलाड केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि त्यानंतर रोहा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अव्वल स्थान पटकावत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याच्या याच सातत्यपूर्ण कामगिरीचा सुवर्णकाळ म्हणून आता त्याची थेट इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे.

येत्या ४ जून २०२६ रोजी निवड झालेले विद्यार्थी इस्रोच्या केंद्राला भेट देणार आहेत. तेथे विनीतसह इतर विद्यार्थ्यांना तब्बल एक आठवडा मुक्काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या सात दिवसांच्या कालावधीत त्यांना अंतराळ संशोधन, उपग्रहांची निर्मिती आणि विज्ञान क्षेत्रातील नवनवीन अत्याधुनिक गोष्टी प्रत्यक्ष अनुभवीत ज्येष्ठ शास्त्रज्ञांकडून शिकायला मिळणार आहेत.

या सुवर्ण यशाबद्दल द. ग. तटकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विनीतचे वडील विशाल कापसे, काका विनोद कापसे आणि अजय कापसे सर यांच्यासह कोलाड परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी विनीतचे कौतुक केले असून त्याला पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची ‘इस्रो’सारख्या राष्ट्रीय संस्थेसाठी झालेली ही निवड इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!