रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सुगीचे दिवस येणार हे निश्चित झालयं…चांगली गोष्ट आहे. या केंद्राचे रूपडं कधी पालटणार याची नक्की अशी डेडलाईन समोर आली नाही, मात्र हे आरोग्य केंद्र नागोठण्यापासून दक्षिणेकडे सहा किलोमीटर अंतरावर वांगणी-आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमच्या वास्तुत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या एका पत्रानुसार सुप्रीमच्या इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला त्यासाठी पैसे अर्थात भाडं मोजायचं आहे. मुळातच ही इमारत सुप्रीम पेट्रोकेमने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपकेंद्र म्हणून बांधली असल्याची माहिती समोर येत आहे. असं असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रच तेथे हलविण्याची भन्नाट कल्पना कोणाच्या डोक्यातून निघाली याचा आता शोध घ्यावा लागणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेची या जिल्ह्यात जी काही महत्वाची आरोग्य केंद्र आहेत त्यात नागोठण्याचे केंद्र टॉप फाईवमध्ये असेल यात बिलकूल शंका नाही. एकतर हे केंद्र (किंवा रुग्णालय) वाहनांची अव्याहत वर्दळ असलेल्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर आहे. नागोठण्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, उद्योगांचा पसाराही वाढत आहे. आसपास आदिवासी वाड्यावस्त्याही मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राला सुसज्जतेचा बुस्टर डोस द्या ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. स्थानिक पत्रकार म्हणून ही मागणी मी स्वतः प्रसारमाध्यमांतून अनेकदा लावून धरलेली आहे. परंतु थातूरमातूर मलमपट्टीपलीकडे काहीही घडलेलं नाही. एक काळ तर असा होता की अपघातग्रस्तांसाठी कापूस, बॅण्डेज बाहेरून विकत आणावे लागत असे. प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत बहुतेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी रुग्णाला ग्लुकोजचे पाणी पाजावे इथपर्यंतच स्वारस्य दाखवलं हे कडवट पण सत्य वास्तव आहे.
कधी काळी नागोठण्यात खमक्या नेत्यांची वानवा नव्हती. आता असे नेतेच नागोठण्यात उरले नाहीत. जे आहेत त्यांनी स्वतःभोवती एक चौकट तयार घेतली असून, त्याच्या पलीकडे कुणी जात नाही. सर्वसमावेशक असे नेतृत्व नाही ही सामान्यजनांची भावना आहे, ज्यात शंभर टक्के तथ्य आहे. आज असे नेतृत्व असते तर प्राथमिक आरोग्य केंद्र तात्पुरते का होईना पण ते स्थलांतरित करताना जिल्हा परिषदेला दहादा विचार करावा लागला असता.
नागोठणे परिसरात मोठाले उद्योग आले. पण एकाही राजकीय नेत्याने या उद्योगांना नागोठणे आणि परिसराला सुसज्ज रुग्णालय बांधून द्या, असे ठणकावून सांगितले नाही. हं, मात्र सीएसआर फंड कसा मिळेल याकडे कटाक्षाने (!) लक्ष दिले. सुप्रीम पेट्रोकेमने उपकेंद्र बांधून दिलंय हे ठीक आहे, मात्र किमान एक सुस्थितीतील रुग्णालय बांधा असे कुणी नेता सुप्रीमच्या व्यवस्थापनाला म्हणालाय असं कधी ऐकीवात नाही. नागोठण्याचे अख्ख प्राथमिक आरोग्य केंद्र आयतेच मिळत असेल तर ते सुप्रीम पेट्रोकेमला नको कशासाठी असेल!
वांगणी आणि परिसराला चांगली आरोग्य सेवा मिळावी याला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. तेथील आरोग्य उपकेंद्र सक्षमतेने सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पावले उचलावीत, त्याचे स्वागत आहे. पण नागोठण्याचे संपूर्ण केंद्रच तेथे हलविणे अप्रस्तुत आहे. नागोठणे शहरात ज्या काही शासकीय, निमशासकीय मोकळ्या इमारती आहेत त्या ठिकाणी हे केंद्र तात्पुरत्या स्वरुपात सुरू करता येईल का, हे पाहिले पाहिजे. पावसाळ्यात गैरसोयीची ठरणार नाही, रुग्णवाहिकेची जा-ये सुकर ठरेल, वाहने उभी राहण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी लागेल.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थलांतराचा घाट घातला जात असताना नागोठणे ग्रामपंचायतीला विश्वासात का घेण्यात आले नाही, हे एक कोडं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोग्य केंद्र स्थलांतराच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांना आवाज उठविण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती. परंतु कडक उन्हामुळे (कदाचित) ती संधी हुकवण्यात आली. असो. या एकूणच निर्माण झालेल्या गदारोळात रायगड जिल्हा परिषदेचे स्थानिक सदस्य म्हणून सुमीत काते यांची नेमकी भूमिका काय आहे, हेही स्पष्ट झाले पाहिजे किंबहुना सर्वसामान्य माणूस ही भूमिका जाणून घेण्यास उत्सुक आहे. आरोग्य केंद्राची ‘प्राथमिक’ता नागोठण्यासाठीच महत्त्वाची असून, नागोठणे पत्रकार संघाचीही तीच आग्रही भूमिका आहे.

अध्यक्ष, नागोठणे पत्रकार संघ
