उरण । घनःश्याम कडू
काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा संदेश सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर वेगाने व्हायरल होत असल्याने रायगड काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी डॉ. मनीष पाटील यांच्या नियुक्तीनंतर स्वतः महेंद्र घरत यांनी पुढाकार घेत नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. त्यामुळे पक्षात सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, त्यानंतर अचानक घरत यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
वरिष्ठ नेत्यांची मौन आणि कार्यकर्त्यांची अस्वस्थता
या संभाव्य राजीनाम्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली. प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी “माहिती घेऊन कळवतो” असे सांगितले, मात्र सायंकाळपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. दुसरीकडे, महेंद्र घरत यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, “उद्या इतर पदाधिकारीही आपल्या पदांचे राजीनामे देणार आहेत,” अशी माहिती घरत समर्थकांकडून दिली जात आहे.
राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
रायगड जिल्ह्यात अत्यंत कठीण काळात काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे खंबीर नेतृत्व म्हणून महेंद्र घरत यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या या संभाव्य राजीनाम्याच्या बातमीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
महेंद्र घरत खरोखरच काँग्रेसला रामराम ठोकणार की ही केवळ पक्षांतर्गत नाराजी आहे? आणि त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल? याकडे आता संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
