• Sun. May 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडच्या काजल साळुंखेची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या चाचणी शिबिरासाठी निवड!

ByEditor

May 24, 2026

रायगड । क्रीडा प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची (RDCA) गुणवान महिला क्रिकेटपटू कु. काजल कैलास साळुंखे हिची महाराष्ट्र महिला वरिष्ठ गटाच्या अंतिम संघ निवडीसाठीच्या मुख्य शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. काजलच्या या यशामुळे रायगडच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

महाडची रहिवासी असलेली काजल साळुंखे स्थानिक ‘एसबीसी क्रिकेट अकॅडमी’मध्ये (SBC Cricket Academy) क्रिकेटचे धडे गिरवत आहे. रायगड जिल्हा महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना तिने सातत्याने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले होते. याच अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तिची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवड चाचणी शिबिरासाठी अधिकृत निवड झाली आहे.

काजलच्या या यशाबद्दल तिचे प्रशिक्षक आवेश चिचकर आणि अकॅडमीचे अध्यक्ष तथा आरडीसीएचे (RDCA) सहसचिव बशीर चिचकर यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला.

“काजलने अकॅडमीमध्ये घेतलेली अथक मेहनत आणि तिचे परिश्रम आज खऱ्या अर्थाने फळाला आले आहेत. ती निश्चितच आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्य संघात स्थान मिळवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे, एसबीसी क्रिकेट अकॅडमीची ही पहिलीच कामगिरी नाही. याआधीही याच अकॅडमीची गुणवान खेळाडू रोशनी पारधी हिने महाराष्ट्र महिला क्रिकेट असोसिएशनच्या १५, १९, २३ आणि वरिष्ठ अशा विविध वयोगटांतील संघात स्थान मिळवून रायगडचा डंका वाजवला आहे. आता काजलच्या रूपाने अकॅडमीने आणखी एक हिरा महाराष्ट्राच्या क्रिकेट पटलावर आणला आहे.

रायगडच्या या दोन्ही गुणी लेकींनी क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उंचावल्याबद्दल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींकडून काजल व रोशनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!