माणगाव । मिलिंद माने
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध शिवप्रेमी संस्थांकडून जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती शिवप्रेमी भूषण शिसोदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ६ जून रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडावर व परिसरात विविध कामांना वेग आला आहे.
गडावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून, संपूर्ण किल्ला रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघणार आहे. गडावरील प्रमुख मार्गांची दुरुस्ती करण्यात आली असून, शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करण्यात येत आहे. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रायगड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे.
“सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी गडाचे पावित्र्य राखून शिस्त व स्वच्छता बाळगावी, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.” असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. यानंतर पारंपरिक मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, शिवगर्जना आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रायगडाचा संपूर्ण परिसर दणाणून जाणार आहे. या सोहळ्यामुळे सध्या रायगड आणि परिसरात शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
