धाटाव । शशिकांत मोरे
रोहे शहरात राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभागाच्या कार्यालयाबाहेर जप्त करून लावलेली चारचाकी वाहने मध्यरात्री एका अज्ञात इसमाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून थेट खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय विभागाच्या ताब्यात असलेल्या सुस्थितीतील वाहनांचे या कृत्यामुळे मोठे नुकसान झाले असून, रोह्यामध्ये या ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकारामुळे तीव्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या रायकर पार्क येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. या विभागाने वेगवेगळ्या दारूच्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली चार सुस्थितीतील चारचाकी वाहने कार्यालयाच्या शेजारी, रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. या वाहनांमध्ये मारुती वॅगनआर (MH 01 AL 6379), मारुती वॅगनआर (MH 06 AN 8805), मारुती वॅगनआर (MH 02 BG 4373) आणि एका मारुती ८०० कारचा समावेश होता.
सदर रस्ता रहदारीचा नसल्याने या वाहनांमुळे कोणालाही अडचण नव्हती. स्थानिक नगरपालिकेनेही या वाहनांविषयी कधी कोणती नोटीस दिली नव्हती. असे असतानाही काल रात्री अचानक जेसीबी आणून ही वाहने अक्षरशः रस्त्यावरून खाली ढकलून देण्यात आली.
सत्तेची नशा की भाईगिरी? शहरात जोरदार चर्चा
पाच ते सहा महिन्यांपूर्वी जप्त केलेली ही वाहने न्यायालयाच्या ताब्यात असून त्यांचा अद्याप निकाल लागलेला नाही. असे असताना रोह्यातीलच एका तरुण राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर हा सर्व प्रकार घडल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. “आपण शासकीय मालमत्तेचे नुकसान करत आहोत याचे भान या नेत्याला राहिले नाही का? कायदा-सुव्यवस्था बाजूला ठेवून ही सत्तेची नशा आणि भाईगिरी आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अधिकारी चक्रावले; नुकसान भरपाईचा प्रश्न
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत. उद्या जर न्यायालयाच्या आदेशाने वाहन मालकांनी आपली वाहने सोडवून नेली, तर या तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार? असा कायदेशीर पेच आता निर्माण झाला आहे.
“कार्यालयाबाहेर लावलेली वाहने जेसीबीद्वारे रस्त्यावरून खाली कोणी ढकलली, याचा शोध आम्ही घेत आहोत. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— अपर्णा पोकळे (सहाय्यक दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रोहा विभाग)
