माणगाव । सलीम शेख
एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, माणगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे २४ तासांच्या आत आरोपीला जेरबंद केले आहे
घरातून निघून गेली अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या घरोशीवाडी येथील ‘निधी उतेकर’ (वय १५ वर्षे) ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आली होती. सोमवार, २५ मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ती वडिलांच्या मोबाईलवर बोलत घरातून बाहेर पडली. मात्र, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. कुटुंबाने तिचा शोध सुरू केला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
जंगलात आढळला मृतदेह
दोन दिवसांच्या शोधकार्यानंतर, बुधवार २७ मे रोजी घरोशीवाडी येथील जंगलात निर्जन स्थळी निधीचा मृतदेह आढळून आला. तिच्या शरीरावरील जखमा पाहता तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. घटनेचे गांभीर्य ओळखून माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांची चार पथके; संशयित ताब्यात
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा उपअधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घरोशीवाडी येथीलच संशयित शुभम उतेकर (वय ३२ वर्षे) याला गुरुवार, २८ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अटक केली.
“या प्रकरणाचा तपास विविध पातळ्यांवर सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.” – संजय बांगर (पोलीस निरीक्षक, माणगाव)
