कल्याण-पाली बससेवेलाही हिरवा कंदील; १३.९६ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता
रायगड । अमूलकुमार जैन
राज्यातील एसटी प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याचे निर्देश दिले. यासोबतच स्थानिक प्रवाशांच्या मागणीची दखल घेत त्यांनी ‘कल्याण-पाली’ बससेवेला हिरवा कंदील दाखवला असून ‘पाली-खोपोली’ मार्गावरील शटल बसच्या फेऱ्या वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
नवीन बसस्थानकाची वैशिष्ट्ये आणि सुविधा
पाली हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन केंद्र असल्याने येथे भाविक आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन सुमारे १३ कोटी ९६ लाख ४४ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.
नवीन बसस्थानकात खालील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत:
- ८ सुसज्ज फलाट (Platforms) आणि प्रशस्त प्रतीक्षालय.
- महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे.
- चालक-वाहकांसाठी विश्रामगृह आणि प्रशासकीय कार्यालये.
- आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष आणि विद्यार्थी पासधारकांसाठी विशेष सुविधा.
- स्वतंत्र कँटीन, उपहारगृह आणि व्यावसायिक दुकाने.
जुनी इमारत जमीनदोस्त; जागेचा वाद नाही
पाली बसस्थानकासाठी १९७१ मध्ये १५,७५७ चौरस मीटर जागा संपादित करण्यात आली होती. त्यावर १९७८ मध्ये उभारण्यात आलेली जुनी इमारत कालबाह्य झाल्याने २०२२ मध्ये पाडण्यात आली होती. या जागेवर कोणतेही अतिक्रमण किंवा न्यायप्रविष्ट प्रकरण नसल्याने नव्या बांधकामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पाहणीदरम्यान दिली.
“पाली हे राज्यातील महत्त्वाचे श्रद्धास्थान आणि पर्यटन केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप प्राप्त होईल.” – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
स्थानिक मागण्यांना तत्काळ प्रतिसाद
दौऱ्यादरम्यान मंत्री सरनाईक यांनी स्थानिक नागरिकांच्या निवेदनाची दखल घेतली. त्यांनी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कल्याण-पाली बससेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच पाली-खोपोली मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन बसेस उपलब्ध करून देऊन फेऱ्या वाढवण्याचे आदेशही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.
