• Sat. May 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऊनाठावाडीच्या जंगलात अज्ञात तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ; खून की अपघात?

ByEditor

May 30, 2026

धाटाव । शशिकांत मोरे
रोहे तालुक्यातील नागोठणेजवळील पाटणसई गावाच्या हद्दीत असलेल्या ऊनाठावाडी जंगल परिसरात एका अनोळखी तरुणाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणाचा खून करून मृतदेह जंगलात फेकून दिला आहे, की सर्पदंश अथवा हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, याबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

२५ मे रोजी ऊनाठावाडी येथील रहिवासी काशिनाथ शिंदे हे जंगलात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. जंगलातील एका निर्जन भागात त्यांना एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच रोहा आणि नागोठणे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.

मृताचे वय अंदाजे १८ ते २३ वर्षे असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने सदर तरुणाचा मृत्यू नेमका कधी झाला आणि तो मृतदेह कोणाचा आहे, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तरुणाची ओळख पटवणे आणि मृत्यूचे गूढ उकलणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!