धाटाव । शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील म्हसकरवाडी येथील दुग्ध व्यावसायिक शेतकरी अमर घाग यांच्या गुरांच्या गोठ्याला गुरुवारी (२८ मे) दुपारी अचानक शॉक सर्किटने भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोठ्यासह आतमध्ये साठवून ठेवलेले पशुखाद्य आणि वैरण जळून खाक झाल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा गोठ्यात गुरे नसल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र या दुर्घटनेमुळे दुग्ध व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले आहे.
महागडा पेंडा आणि पशुखाद्य जळून खाक
शेतकरी अमर घाग हे ३० ते ३५ म्हशींचा सांभाळ करत असून त्यांचा मोठा दुग्ध व्यवसाय आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोठ्यामध्ये २० रुपये प्रति पेंढा या महागड्या दराने खरेदी केलेले सुमारे ५ ते ६ हजार पेंढे साठवून ठेवले होते. गोठ्याला आग लागताच या पेंड्याने पेट घेतला आणि आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेत पेंड्यासोबतच गुरांचे वैरण, १० ते १५ गोणी पशुखाद्य आणि ५०० लीटरची पाण्याची सिंटेक्स टाकी असे सर्व साहित्य जळून खाक झाले.
गुरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न
संपूर्ण गोठा आणि चारा जळाल्याने दुग्ध व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. बाजारात पेंड्याचे भाव गगनाला भिडलेले असताना, आता ३०-३५ जनावरांना दररोज चारा आणि पाणी कसे पुरवायचे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.
“अचानक आलेल्या या संकटामुळे आमचे आभाळ फाटले आहे. जनावरांचा चारा डोळ्यादेखत जळून खाक झाला. स्थानिक तलाठ्यांनी केवळ पंचनामा केला आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस शासकीय मदत मिळालेली नाही.”
– अमर घाग, पीडित शेतकरी
शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर संताप
एकीकडे शेतकऱ्यावर इतके मोठे संकट कोसळले असताना, दुसरीकडे शासकीय यंत्रणेकडून अद्याप कोणतीही तातडीची आर्थिक मदत मिळालेली नाही. प्रशासनाने केवळ पंचनामा उरकून औपचारिकता पाळल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अचानक आलेल्या अशा संकटाच्या वेळी शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊन या दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्याला उभे करावे, अशी जोरदार मागणी म्हसकरवाडी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
