नाराज कार्यकर्त्यांच्या भूमिकेचेही केले स्वागत; पनवेल काँग्रेसमधील वादावर मौन सोडले
उरण । विठ्ठल ममताबादे
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षांतर्गत सुरू झालेल्या वादावर आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर नवनियुक्त जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. “माझी ही नियुक्ती कोणत्याही शिफारस किंवा वशिल्यामुळे झालेली नसून, पक्षातील प्रदीर्घ अनुभव, कार्यकर्तृत्व आणि कार्यकर्त्यांच्या जनभावनेच्या आधारेच पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे,” असा ठाम दावा श्रुती म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्रुती म्हात्रे यांनी सांगितले की, पनवेलसह उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. काँग्रेस पक्षाने या तिन्ही ठिकाणांसाठी जिल्हाध्यक्ष पदाकरिता रीतसर आणि जाहीरपणे अर्ज प्रक्रिया राबवली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी स्वतः रायगड आणि पनवेल परिसराचा दौरा करून निरीक्षक म्हणून काम पाहिले आणि इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या संपूर्ण पारदर्शक प्रक्रियेनंतरच हायकमांडने माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या नियुक्तीमागे कोणत्याही नेत्याची शिफारस नसून केवळ पक्ष संघटनेतील कामाची पावती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाराज गट माझेच बंधू; त्यांच्या भूमिकेचे स्वागत
पनवेल काँग्रेसमधील नाराज गटाने थेट मुंबईतील ‘टिळक भवन’ गाठून या निवडीविरोधात आक्षेप नोंदवल्याबाबत विचारले असता, श्रुती म्हात्रे यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, “राजकारणात प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते टिळक भवन येथे गेले असतील, तर त्यात काहीही वावगे नाही. ते सर्व माझेच बंधू आहेत आणि न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच करते.” मात्र, काही लोकांची दिशाभूल करून हा निषेध घडवून आणला गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“रीचेकिंगनंतर निकाल अधिक स्पष्ट होतो”
सध्याच्या अंतर्गत वादावर सूचक वक्तव्य करताना म्हात्रे म्हणाल्या, “ज्याप्रमाणे परीक्षेनंतर रीचेकिंग केल्यावर निकाल अधिक चांगला आणि स्पष्ट समजतो, तसेच या वादाचे आहे. येत्या काही दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून जे काही निर्णय होतील, त्यातून वस्तुस्थिती सर्वांसमोर येईल.” तसेच २० मे रोजीच पदांची अधिकृत घोषणा झाली होती आणि त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली होती, असा दावाही त्यांनी केला.
पदभार स्वीकारताच आंदोलनात उडी
अंतर्गत वाद बाजूला सारून पक्षवाढीसाठी कामाला लागल्याचे सांगताना श्रुती म्हात्रे म्हणाल्या की, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी थेट पक्षाच्या आदेशानुसार अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आगामी काळात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व नाराज आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच पुढे जाणार असल्याचा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.
