आजी-माजी लोकप्रतिनिधींसह महिलांचीही पाठ; आता ८ जून रोजी होणार सभा
धाटाव । शशिकांत मोरे
सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळवून देणे आणि गावच्या विकासाला गती देणे, यासाठी ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. मात्र, रायगड जिल्ह्यात विशेष नावलौकिक असलेल्या धाटाव ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा आणि महिला वर्गाचा ग्रामसभेबाबतचा प्रचंड निरुत्साह समोर आला आहे. नागरिकांनी फिरवलेल्या पाठीमुळे अखेर गणसंख्येअभावी (कोरम) ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ प्रशासनावर आली.
शुक्रवार, दि. २९ मे रोजी सकाळी ११ वाजता धाटाव ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा प्रशासक एम. जी. फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वाच्या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे, सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा ग्रामनिधी व पाणीपुरवठा कर मागणी कायम करणे, तसेच सन २०२५-२६ चा वार्षिक जमा-खर्च वाचून मंजूर करणे, अंदाजपत्रकीय जादा खर्चास मंजुरी देणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार होते.
गावच्या विकासाच्या दृष्टीने हे सर्व विषय अत्यंत महत्त्वाचे असतानाही, ग्रामपंचायतीत पूर्वी पदे भूषवलेल्या आजी-माजी सरपंच, उपसरपंच किंवा सदस्यांपैकी एकानेही या सभेला उपस्थिती दर्शवली नाही. लोकप्रतिनिधींसह बहुतांश ग्रामस्थांनीही या सभेला दांडी मारल्याने आणि विशेष म्हणजे एकही महिला उपस्थित नसल्याने, अपुऱ्या गणसंख्येअभावी ग्रामसेवक अमोल तांबडे यांना ही सभा तहकूब करावी लागली.
ग्रामसभेला नागरिकांचा मिळालेला थंड प्रतिसाद चिंतेचा विषय ठरत आहे. दरम्यान, गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आलेली ही अत्यंत महत्त्वाची ग्रामसभा आता पुढील महिनाभरात, म्हणजेच ८ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात येईल, अशी अधिकृत माहिती ग्रामसेवक अमोल तांबडे यांनी दिली आहे.
