५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक अटकेत तर दोन जमीनमालक फरार; हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले
उरण । विठ्ठल ममताबादे
नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने उरण तालुक्यातील चाणजे गाव येथे अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर मोठी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या अंतराने एकाच जागेवर दोन वेगवेगळे छापे टाकून दोन गुन्हे दाखल केले आहेत. या खळबळजनक कारवाईत एकूण ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ६२ वर्षीय हिरामण काशिनाथ म्हात्रे याला दोन्ही गुन्ह्यांत मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने पहिली कारवाई बुधवार, दिनांक २९ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजता केली. चाणजे गाव येथील रवि दामोदर म्हात्रे यांच्या मालकीच्या जागेत हिरामण म्हात्रे हा बेकायदेशीरपणे गावठी दारू गाळताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११५७/२०२५, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई), ६५(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळावरून पोलिसांनी २०० लिटर क्षमतेचे ८ निळे ड्रम, त्यात असलेले गूळ-पाणी मिश्रित अंदाजे २०० लिटर द्रावण, अल्युमिनीअमची टाकी, खुंडी, पातेले, लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन व काळा गूळ असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी हिरामण म्हात्रे याने सदरचे काम जागामालक रवि दामोदर म्हात्रे याच्या सांगण्यावरून करत असल्याची कबुली दिली. संशयित आरोपी रवि म्हात्रे सध्या फरार आहे.
दुसरी कारवाई: दोन तासांनी त्याच जागेवर पुन्हा धाड
पहिली कारवाई संपल्यानंतर अवघ्या दोन तासांनी, म्हणजेच रात्री ८:४० वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच जागेवर पुन्हा दुसरा छापा टाकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळीही मुख्य आरोपी हिरामण म्हात्रे हाच दुसऱ्या एका इसमाच्या म्हणजेच अनिल म्हात्रे याच्या सांगण्यावरून दारू गाळताना आढळून आला.
याप्रकरणी गु.र.नं. १५८/२०२६ अन्वये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. या दुसऱ्या छाप्यात २०० लिटरचे ७ ड्रम, गूळ-पाणी मिश्रित द्रावण, अल्युमिनीअम टाकी, स्टील टाकी, लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन व काळा गूळ असा २७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अनिल म्हात्रे हा देखील फरार झाला आहे.
दोन्ही गुन्ह्यांमध्ये ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने, कायद्यानुसार मुख्य आरोपी हिरामण म्हात्रे याला बीएनएसएस (BNSS) कलम ३५(३) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. दोन्ही घटनास्थळांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत देशमुख व गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांदवे करत आहेत.
उरणमधील अवैध धंद्यांचे जाळे पुन्हा चर्चेत
एकाच रात्री, एकाच जागेवर आणि एकाच आरोपीला दोन वेगवेगळ्या मालकांसाठी दारू गाळताना पकडल्यामुळे उरण तालुक्यातील अवैध धंद्यांचे जाळे किती घट्ट पसरले आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुन्हे शाखेने सलग दोन छापे टाकून केलेल्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील हातभट्टी चालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
