• Sun. May 31st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरातील ‘ते’ धोकादायक झाड हटवा; शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी

ByEditor

May 31, 2026

धाटाव | शशिकांत मोरे
कोलाड-रोहा मार्गालगत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातील एक मोठे आणि जुने झाड अत्यंत धोकादायक अवस्थेत उभे असून, ते त्वरित हटवावे किंवा त्याच्या धोकादायक फांद्या छाटाव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना शहर प्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला गुरुवारी एक निवेदन देण्यात आले.

​येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून, वादळी वाऱ्यामुळे हे झाड कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. झाडाच्या मोठ्या फांद्या थेट रस्त्याच्या दिशेने झुकलेल्या आहेत. या मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते, तसेच शासकीय कामासाठी नागरिक आणि कर्मचाऱ्यांची या परिसरात सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

​पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज

पावसाळा तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाकडून अशा धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळात हे झाड कोसळल्यास मोठी जीवित किंवा वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

​निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख राजेश काफरे, उपशहर प्रमुख प्रीतम देशमुख, युवासेना सचिव भारत वाकचौरे, लांडर शाखा प्रमुख मंगेश जाधव तसेच शिवसैनिक गणेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!