अलिबाग । अमुलकुमार जैन
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या किमतींमधील साततीची वाढ तसेच घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याविरोधात रायगड जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी अलिबाग येथे जोरदार जनआंदोलन करत केंद्र सरकारविरोधात तीव्र हल्लाबोल केला. बैलगाडी, बैलजोडी, घोषणाबाजी आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या मोर्चाकडे वेधले गेले होते.
रायगड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ. मनिष पाटील तसेच पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. अलिबाग शहरातील काँग्रेस भवन येथून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे”, “इंधन दरवाढ थांबवा”, “गॅस दर कमी करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी शहरातून भव्य मोर्चा काढला. भाजपच्या जुन्या कार्यालयासमोर आंदोलकांनी काही काळ ठिय्या आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला आणि त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.
या आंदोलनातील सर्वात मोठे आकर्षण ठरली ती बैलगाडी आणि बैलजोडी. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांना आता वाहने परवडत नसून, पुन्हा पारंपरिक साधनांचा वापर करण्याची वेळ आली आहे, हा संदेश देण्यासाठी काँग्रेसने आंदोलनात प्रतीकात्मकरीत्या बैलगाडीचा वापर केला; ज्याची शहरात मोठी चर्चा रंगली होती. दरम्यान, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी कमरेला माडाच्या झावळ्या बांधून अत्यंत वेगळ्या आणि आक्रमक शैलीत सरकारचा निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांच्या हातात केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक, पक्षाचे झेंडे आणि घोषवाक्यांनी सजलेले बॅनर लक्ष वेधून घेत होते.
यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले असून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने जनभावनेचा आदर करत दरकपात करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या जनआंदोलनामुळे अलिबाग शहरात काही काळ राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणली नाही तर आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्याचा कडक इशारा काँग्रेसने दिला आहे.
