रोहा (वार्ताहर) : नेरव सुतारवाडी गावचा सुपुत्र आणि द. ग. तटकरे महाविद्यालयातील कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकणारा विद्यार्थी साहिल सिमा संतोष सुतार याची भारतीय सैन्य दलात (Indian Army) निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
साहिलने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तो द. ग. तटकरे महाविद्यालयात आपले उच्च शिक्षण घेत असतानाच देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने प्रयत्न करत होता. अखेर त्याच्या कष्टाला यश आले असून त्याची भारतीय लष्करात निवड झाली आहे.
त्याच्या या यशाबद्दल ‘नवतरुण मित्र मंडळ सुतारवाडी’ आणि परिसरातील ग्रामस्थांकडून त्याचे जाहीर कौतुक व हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. साहिलच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर तरुणांनाही सैन्य दलात भरती होण्यासाठी मोठी प्रेरणा मिळणार आहे. त्याच्या पुढील देशसेवेच्या प्रवासासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
