• Mon. Jun 1st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यात गावठी दारूचा धंदा तेजीत; राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

ByEditor

Jun 1, 2026

चिरनेर, साई, दिघाटीसह अनेक गावांत हातभट्ट्यांचे पेव; पिंपरी-चिंचवडसारख्या दुर्घटनेची भीती

उरण । अनंत नारंगीकर
पनवेल आणि उरण तालुक्यातील चिरनेर, साई, दिघाटी, केळवणे, आवरे, वशेणी यांसह इतर अनेक गावांमध्ये गावठी दारूचा बेकायदेशीर धंदा सध्या मोठ्या तेजीत सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज) आणि स्थानिक पोलिसांच्या कथित वरदहस्तामुळेच हा राजरोस विक्रीचा व्यवसाय फोफावला असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. या निष्काळजीपणामुळे परिसरात पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारूकांडासारख्या भीषण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती आता जनमानसात व्यक्त होत आहे.

तरुण पिढी व आदिवासी समाज विळख्यात

हातभट्टीच्या या अवैध दारूमुळे परिसरातील तरुण पिढी आणि महिला मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्या आहेत. दारुड्यांच्या त्रासामुळे गावागावांतील शांतता भंग पावत असून, अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. विशेषतः उरणमधील आदिवासी समाजाची तरुण पिढी या जीवघेण्या व्यसनाच्या गर्तेत वेगाने अडकत चालली असून, त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.

प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

या गंभीर परिस्थितीबाबत सर्वसामान्य जनतेकडून पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, दोन्ही यंत्रणांकडून या तक्रारींकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. कारवाईच्या नावाखाली केवळ खानापूर्ती केली जात असल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल अधिकच वाढले आहे.

एकाच गावावर कारवाई का? चाणजे येथील कारवाईनंतर उठले प्रश्न

पिंपरी-चिंचवडमधील घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी नुकतीच ‘चाणजे’ येथील हातभट्टीवर धडक कारवाई करून ती उद्ध्वस्त केली. या कारवाईचे जनतेतून कौतुक होत असले, तरी यामुळे पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “जर चाणजेमध्ये कारवाई होऊ शकते, तर मग इतर गावांमध्ये राजरोस सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस मेहेरबान का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

सर्व गावांमध्ये एकाच वेळी कठोर मोहीम राबवून हा अवैध धंदा समूळ नष्ट करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील सजग नागरिकांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!