• Wed. Jun 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडचा पेच सुटला! उदय सामंतांच्या मध्यस्थीनंतर जुईली दळवी माघार घेणार?

ByEditor

Jun 3, 2026

रायगड : राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी रोखण्यात अखेर नेतृत्वाला यश येत असल्याचे चित्र आहे. रायगड विधानपरिषद जागेवरून निर्माण झालेला पेच मिटला असून, शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचनेनंतर आणि मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर हा तोडगा निघाल्याचे समजते.

​महायुतीच्या जागावाटपात रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) सुटली असून, तिथून अनिकेत तटकरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही मागणी स्थानिक नेत्यांची होती. त्यातच शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

​कोकणातील ही बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार आणि मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. मुंबईतील ‘एक्सप्रेस टॉवर’ येथे कोकणातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.​”महायुतीचा धर्म आणि नियम सर्वांनी पाळलाच पाहिजे,” अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. ​या वरिष्ठ पातळीवरील सूचनेनंतर आमदार महेंद्र दळवी आपल्या मुलीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास तयार झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

​दुसरीकडे, रायगडच्या जागेवरून शिवसेना नेते आणि आमदार भरत गोगावले हे देखील आक्रमक होते. ते आपल्या मुलासाठी या जागेवरून आग्रही होते. मात्र, ही जागा तटकरे कुटुंबाला (राष्ट्रवादी) जात असल्याचे स्पष्ट होताच, गोगावले यांनी महायुतीसमोर नवीन प्रस्ताव ठेवला आहे. तटकरेकडे उमेदवारी जात असेल, तर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी गोगावले यांनी लावून धरली आहे.

​जुईली दळवी यांच्या माघारीमुळे महायुतीमधील रायगडचा तात्पुरता पेच सुटला असला, तरी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदाच्या मागणीमुळे आगामी काळात रायगडच्या राजकारणात कोणते नवीन समीकरण आकारास येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!