‘लाल सलाम’च्या घोषणांनी परिसर दणाणला; मोरे कुटुंबाच्या लोकसेवेचा वारसा अखंड
रेवदंडा । सचिन मयेकर
रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष तथा महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव मोरे यांची ९ मते मिळवून शानदार निवड झाली आहे. माजी उपसरपंच सौ. मंदा माणिक बळी यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
या निवडणुकीत एकूण १६ सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये संतोष मोरे यांना ९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुराराम मोहनलाल माळी यांना ७ मतांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताच शेकाप आणि महाविकास आघाडीच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. विजय निश्चित होताच नवनिर्वाचित उपसरपंच संतोष (बाबू) मोरे यांनी हात उंचावत “लाल सलाम”ची घोषणा दिली, ज्याला उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या विजयानंतर बोलताना संतोष मोरे यांनी सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच रेवदंडा ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा शब्द दिला. विशेष म्हणजे, संतोष मोरे यांना सामाजिक व राजकीय कार्याचा मोठा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांचे वडील सदाशिव गणपत मोरे (दादा मोरे) यांनी रेवदंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद अनेक वर्षे यशस्वीपणे भूषविले होते. सर्वसामान्यांचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादा मोरे यांच्याकडूनच संतोष मोरे यांना समाजकारण व लोकसेवेचे बाळकडू मिळाले. सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग, गणेशभक्ती आणि भजनसेवेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
मोरे कुटुंबाचा हा राजकीय वारसा केवळ संतोष मोरे यांच्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्या पत्नी सौ. सोनाली संतोष मोरे यांनीही यापूर्वी रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यामुळे दादा मोरे यांच्यापासून सुरू झालेला लोकसेवेचा हा वारसा, सोनाली मोरे यांच्या सरपंचपदापर्यंत आणि आता संतोष मोरे यांच्या उपसरपंचपदाच्या निवडीपर्यंत अखंडपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आजची ही निवड म्हणजे मोरे कुटुंबाच्या अनेक दशकांच्या लोकसेवेवर ग्रामस्थांनी पुन्हा एकदा व्यक्त केलेला विश्वास मानला जात आहे.
या विजयी सोहळ्याप्रसंगी सुरेश खोत, संदीप खोत, निलेश खोत, निलेश गाडे, अशोक नाईक, शरद वरसोलकर, जनार्दन कोंडे, विजय चौलकर, प्रमोद नवखारकर (बाळू), मिलिंद चुनेकर, मिलिंद वाडकर, राहुल गणपत, संतोष जाधव, आशिष गोधळी यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
