शिवभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना सूट
महाड । मिलिंद माने
किल्ले रायगड येथे संपन्न होणाऱ्या ऐतिहासिक ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळा-२०२६’ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सोहळ्याच्या कालावधीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह रायगडाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
हा वाहतूक बंदी आदेश शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजल्यापासून ते शनिवार, दिनांक ६ जून २०२६ रोजी रात्रौ १०:०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. यामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा (नागोठणे) ते कशेडी घाट या दरम्यान, तसेच माणगाव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव-ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड-नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या तिन्ही प्रमुख मार्गांवरून जड वाहनांच्या वाहतुकीस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ५ आणि ६ जून रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई यांसह संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त स्वतःच्या वाहनांनी किल्ले रायगड येथे दाखल होतात. यासोबतच सोहळ्याच्या आयोजकांची आणि विविध शासकीय यंत्रणांची वाहनेही मोठ्या प्रमाणात येत असतात. मुंबई-गोवा महामार्गावरून नियमितपणे होणारी जड वाहनांची वाहतूक आणि शिवभक्तांच्या वाहनांची गर्दी यामुळे महामार्गावर भीषण अपघात किंवा मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवभक्तांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.
दरम्यान, या वाहतूक बंदीमधून दूध, पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस (LPG), औषधे, ऑक्सिजन सिलेंडर आणि भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पोलीस दलाची वाहने, अग्निशामक दल (फायर ब्रिगेड) आणि रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन सेवांच्या वाहनांवरही हे निर्बंध लागू राहणार नाहीत. या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित पोलीस आणि वाहतूक नियंत्रण विभागाला दिले आहेत.
