मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली; प्रशासकीय अनास्थेमुळे अपघातांचा धोका वाढला
उरण । अनंत नारंगीकर
पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना, उरण तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन किती ‘सक्षम’ आहे याचे पितळ उघडे पाडणारे वास्तव समोर आले आहे. उरण आणि नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या जासई ते जेएनपीए बंदराच्या मुख्य रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीसह मोठ्या अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

दरवर्षी सिडको, स्थानिक ग्रामपंचायत, प्रकल्प व्यवस्थापन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांसारख्या विविध यंत्रणांकडून पावसाळ्यापूर्वी नैसर्गिक पाण्याचे स्रोत, नाले, आणि रस्त्यांवरील गटारांची दुरुस्ती व सफाई करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, यंत्रणांच्या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळे पहिल्याच पावसात किंवा पावसाळ्यापूर्वीच या कामांची पोलखोल रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्यातून होत असते. यावर्षी ही परिस्थिती ओढावू नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक स्थानिक प्रशासनाला आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
असे असतानाही उरण तालुक्यात मात्र मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाची पुरती अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचे ताजे उदाहरण म्हणजेच जासई-जेएनपीए सर्व्हिस रोडची झालेली ही दुरवस्था आहे. पावसाळा तोंडावर असूनही रस्ता पाण्याखाली असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने केवळ कागदावर घोडे न नाचवता प्रत्यक्ष जमिनीवर काम करावे, अशी मागणी होत आहे. गाव परिसरातील व रस्त्यांवरील गटारांची कामे तात्काळ पूर्ण करावीत आणि झालेल्या नालेसफाईची वरिष्ठांनी खरोखरच पाहणी करावी, अशी आग्रही मागणी आता परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
