• Wed. Jun 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पावसापूर्वीच उरणच्या बाजारपेठेत ‘शेवळा’ची एन्ट्री; निसर्गाच्या किमयेने नागरिक अचंबित!

ByEditor

Jun 3, 2026

उरण । घन:श्याम कडू
जून महिना सुरू झाला तरी आकाशात ढगांच्या तुरळक उपस्थितीशिवाय पावसाचा थेंबही पडलेला नाही. असह्य उकाडा आणि कडक उन्हाचा चटका कायम असतानाच, उरण परिसरात पावसाळ्याची चाहूल देणारी पारंपरिक ‘शेवळाची भाजी’ बाजारात दाखल झाली आहे. साधारणपणे मुसळधार पाऊस पडून गेल्यावर उगवणारी ही रानभाजी यंदा पावसापूर्वीच मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने नागरिक आणि कृषी जाणकारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी

उरण शहरासह ग्रामीण भागातील विविध बाजारपेठा, मुख्य चौक आणि नाक्यांवर सध्या शेवळाची भाजी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. आदिवासी महिला व स्थानिक विक्रेते रस्त्याच्या कडेला किंवा डोक्यावर टोपल्या घेऊन या रानभाजीची विक्री करत आहेत. पावसाळी रानभाज्यांची विशेष आवड असणाऱ्या खवय्यांकडून या भाजीला मोठी मागणी असून खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.

हवामान बदलाचा परिणाम?

सामान्यतः पावसाळा सुरू झाल्यावर शेवळे, तांदळा, भारंगी, कुर्डू यांसारख्या रानभाज्यांचा हंगाम सुरू होतो. मात्र, यंदा पावसाआधीच शेवळांची आवक झाली आहे. गेल्या काही दिवसांत वातावरणात वाढलेली आर्द्रता, अधूनमधून पडलेल्या पूर्वमोसमी (वलसाडी) सरी आणि हवामानातील बदल यामुळे शेवळांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

खाद्यसंस्कृतीत मानाचे स्थान

पावसाळी रानभाज्यांमध्ये शेवळाला अत्यंत मानाचे आणि वेगळे स्थान आहे. चव, पौष्टिकता आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीमुळे या भाजीला दरवर्षी मोठी मागणी असते. ग्रामीण भागात शेवळाची भाजी, भजी, रस्सा यांसारखे विविध चवदार पारंपरिक पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेतला जातो.

शेतकरी चिंतेत, तर नागरिक उत्सुक

एकीकडे जून महिना उजाडूनही पाऊस लांबल्याने आणि उन्हाचा तडाखा कायम असल्याने बळीराजा चिंतेत ग्रासला आहे. मात्र, दुसरीकडे पाऊस नसतानाही शेवळांचे पीक येणे ही निसर्गाची अनोखी किमया मानली जात आहे. पाऊस अद्याप दुरावलेला असला, तरी शेवळांच्या या आगाऊ आगमनामुळे निसर्गाने पावसाळ्याची वर्दी आधीच दिल्या ride ची भावना उरणकरांमध्ये निर्माण झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!