उरण । विठ्ठल ममताबादे
एनपीटी पोर्टकडे जाणाऱ्या अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. पियूपी बिल्डिंग आणि इंडियन कस्टम कार्यालयाजवळ आज (दि. ३) सकाळी १०:४० वाजण्याच्या सुमारास तेलाने भरलेला एक अवजड टँकर अचानक पलटी झाला. या अपघातात हजारो लिटर तेल रस्त्यावर सांडल्याने मोठे आर्थिक व पर्यावरणीय नुकसान झाले असून, पोर्टची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी टळली असली, तरी रस्त्यावर पसरलेल्या तेलामुळे हा मार्ग दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोकादायक आणि निसरडा बनला आहे.
हा मार्ग पोर्टच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने अपघातानंतर बघता बघता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत सांडलेले तेल बाजूच्या गटारात आणि परिसरात पसरल्याने पर्यावरणीय धोक्याची घंटा वाजली आहे. जेएनपीटी पोर्ट रोडवर गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिकाच सुरू असल्याने या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अवजड वाहनांची बेसुमार वर्दळ, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक व्यवस्थापनातील कमालीच्या त्रुटी आणि वेगमर्यादेचे सर्रास होणारे उल्लंघन यांमुळे हा रस्ता आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रत्येक वेळी अपघात झाल्यावर प्रशासन केवळ तात्पुरती मलमपट्टी करते, मात्र कायमस्वरूपी तोडगा काढला जात नसल्याने एखाद्या दिवशी मोठी जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उरणकरांनी उपस्थित केला आहे. तेलामुळे रस्ता कमालीचा निसरडा झाल्याने येथे आणखी मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने आतातरी जागे होऊन अवजड वाहनांच्या गतीवर कडक नियंत्रण ठेवावे, अपघातप्रवण क्षेत्रांची तपासणी करून गतिरोधक व सूचना फलक लावावेत आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापन करावे, अशी मागणी होत आहे. केवळ अपघात झाल्यावर घटनास्थळी धाव घेणारे संबंधित विभाग आता तरी ठोस पावले उचलणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
