• Wed. Jun 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खाजगी शाळांची मनमानी; शैक्षणिक साहित्याच्या दरवाढीमुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले!

ByEditor

Jun 3, 2026

विशिष्ट दुकानांतूनच खरेदी करण्याची शाळांची सक्ती; शिक्षण विभागाने कारवाई करण्याची पालकांची मागणी

​कोलाड | विश्वास निकम
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असतानाच, खाजगी शाळांकडून गणवेश, वह्या, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्याचे दर भरमसाठ वाढवण्यात आले आहेत. या वाढलेल्या दरांमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यातच अनेक शाळा व्यवस्थापनांकडून विशिष्ट दुकानांतूनच सर्व साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून, पालकांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​चालू शैक्षणिक वर्षात गणवेशांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, एका विद्यार्थ्याच्या गणवेशामागे पालकांना हजारो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. गणवेशासोबतच वह्या, पाठ्यपुस्तके, बूट, स्कूल बॅग, ओळखपत्र (आयकार्ड) आणि चित्रकला साहित्य अशा सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईच्या या दुहेरी फटक्यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

बाहेरील साहित्याला नकार; पालकांची कोंडी!

काही पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पालकांनी बाहेरील बाजारातून किंवा इतर दुकानांतून कमी दरात साहित्य खरेदी केले, तर शाळा प्रशासन ते स्वीकारण्यास नकार देते. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भीतीने पालकांना नाईलाजाने शाळांनी ठरवून दिलेल्या महागड्या दुकानांतूनच साहित्य खरेदी करावे लागत आहे.

सामाजिक संघटना आक्रमक; शासनाने नियमांची अंमलबजावणी करावी

​या गंभीर प्रकाराची दखल आता स्थानिक सामाजिक संघटनांनीही घेतली आहे. “शिक्षण हा व्यवसाय नसून सेवा आहे, याचे भान शाळा व्यवस्थापनाने ठेवले पाहिजे,” असे मत संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. खाजगी शाळांच्या या वाढत्या मनमानीला आळा घालण्यासाठी आणि पालकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच, नियमबाह्य सक्ती करणाऱ्या संबंधित शाळांवर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता कोलाड परिसरातील पालक वर्गातून केली जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!