• Wed. Jun 3rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आरडीसीए महिला प्रीमियर लीग: चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर ठरली ‘विजेती’!

ByEditor

Jun 3, 2026

अटीतटीच्या सामन्यात खोपोली क्रिकेट असोसिएशनचा १३ धावांनी पराभव

रायगड | क्रीडा प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत ‘चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर’ संघाने अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. गव्हाण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या अंतिम सामन्यात खारघर संघाने खोपोली क्रिकेट असोसिएशन संघाचा १३ धावांनी पराभव करत ऐतिहासिक चॅम्पियनशिप पटकावली.

​अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर संघाने निर्धारित २० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावांचा मजबूत पल्ला गाठला. यामध्ये अमिषा बामणे हिने सर्वाधिक ३८ धावा फटकावल्या, तर मनस्वी गोड हिने ३४ धावांची बहुमूल्य खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला. खोपोली क्रिकेट असोसिएशन संघाकडून गोलंदाजी करताना श्रावणी मोरे हिने २, तर समृद्धी कांबळे हिने १ फलंदाज बाद केला. प्रत्युत्तरात, १४४ धावांचे आव्हानात्मक लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या खोपोली क्रिकेट असोसिएशन संघाचा डाव निर्धारित २० षटकांमध्ये ५ बाद १३० धावांवर रोखला गेला. खोपोलीकडून ज्ञानेश्वरी येरूणकर हिने दमदार फलंदाजी करत सर्वाधिक ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली आणि काव्या धाडवे हिने २० धावांचे योगदान देत चांगली झुंज दिली. मात्र, खारघर संघाच्या हेतवी रावासिया हिने ३ आणि वेदिका तेटगुरे हिने २ फलंदाजांना बाद करत खोपोलीच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले.

​या ऐतिहासिक विजयानंतर चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर संघाचे संघमालक आकाश पटरिया यांनी आपल्या संघाच्या दर्जेदार कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला, तर खोपोली क्रिकेट असोसिएशन संघाचे मालक यशवंत साबळे यांनी विजेतेपद हुकले असले तरी आपल्या खेळाडूंनी शेवटपर्यंत दिलेल्या कडव्या झुंजीबद्दल मुलींचे विशेष कौतुक केले.

​सामन्यानंतर झालेल्या दिमाखदार सोहळ्यात उत्कृष्ट खेळाडूंचा वैयक्तिक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. यामध्ये अंतिम सामन्यातील ‘प्लेअर ऑफ दि मॅच’ म्हणून हेतवी रावासिया, ‘फायटर ऑफ दि मॅच’ ज्ञानेश्वरी येरूणकर, ‘उत्कृष्ट फलंदाज’ अपर्णा सिंह, ‘उत्कृष्ट गोलंदाज’ हेतवी रावासिया, ‘वूमन ऑफ दि सिरिज’ समृद्धी कांबळे, ‘उत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ वेदिका तेटगुरे आणि ‘उत्कृष्ट यष्टिरक्षक’ म्हणून अपर्णा सिंह यांची निवड करण्यात आली. तसेच, आरडीसीएच्या वतीने समृद्धी कांबळे, समिधा तांडेल, स्वरा खेडेकर व अमिषा बामणे या गुणी खेळाडूंना विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या भव्य बक्षिस वितरण समारंभासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, कार्याध्यक्ष यशवंत साबळे, उपाध्यक्ष राजेश पाटील, सहसचिव जयंत नाईक, सदस्य संजय तावडे, अरुण शिंदे, देवेंद्र पाटील, नरेंद्र मयेकर, प्रदीप खलाटे, विनय पाटील तसेच आदेश क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष अमित कडू आणि सुजित ठाकूर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!