• Sun. Jun 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

ByEditor

Jun 14, 2026

माणगाव: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहे. काल रात्री कोलाड ते इंदापूर दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एक दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सोनी, ऊर्मिला सोनी आणि त्यांचा ५ वर्षीय नातू रुद्राक्ष सोनी (तिघेही रा. नागोठणे) हे दुचाकीवरून इंदापूर ते नागोठणे असा प्रवास करत असताना हा अपघात झाला. महामार्गावरील कोलाड-इंदापूर दरम्यान असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची दुचाकी नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळली.

​या अपघातात तिघांनाही गंभीर दुखापत झाली असून, ऊर्मिला सोनी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील तातडीच्या उपचारासाठी त्यांना नवी मुंबई येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ५ वर्षीय रुद्राक्ष आणि संतोष सोनी यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी समोर येत आहे. या प्रकरणी माणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!