• Sun. Jun 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएसडब्ल्यू लिक्विड जेट्टीवर भीषण स्फोट; दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू

ByEditor

Jun 14, 2026

‘पिगिंग’ प्रक्रियेदरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

​उरण | घनश्याम कडू
जेएनपीए बंदरातील जेएसडब्ल्यूच्या लिक्विड जेट्टीवर रविवारी सकाळी झालेल्या एका भीषण दुर्घटनेत दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने उरण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. तेलवाहिनी (पाईपलाईन) स्वच्छ करण्याच्या ‘पिगिंग’ प्रक्रियेदरम्यान झालेल्या या प्रचंड स्फोटामुळे बंदर परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेत ओरिएंट कंपनीचे कर्मचारी जगन्नाथ गावंड (वय ५५, रा. पिरकोन, उरण) आणि बेंजोप्लास्ट कंपनीचे लोडिंग मास्टर राजेंद्र शिंदे (वय ३५, मूळ रा. लांजा, जि. रत्नागिरी) यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, जेएनपीटी बंदरात लागलेल्या ऑईल जहाजातील माल खाली केल्यानंतर तेलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ‘पिगिंग’ प्रक्रियेदरम्यान अचानक पाईपलाईनमध्ये प्रचंड दाब निर्माण होऊन भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की घटनास्थळी कार्यरत असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. दुर्घटनेनंतर सहकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले; मात्र दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरावर शोककळा पसरली आहे.

​दरम्यान, या दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेलवाहिनी स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, कामगारांना आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली होती का, तसेच पाईपलाईनमधील दाबाची योग्य तपासणी झाली होती का, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशा धोकादायक स्वरूपाच्या तांत्रिक कामासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि तज्ज्ञांची देखरेख पुरेशी होती का, असाही सवाल उपस्थित होत आहे. मृत कामगारांच्या नातेवाईकांनी या संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेतली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

​या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिगिंग प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाड झाला की सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीत काही त्रुटी राहिल्या, याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून प्राथमिक माहिती संकलित केली असली, तरी या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यास कंपन्यांच्या प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे दुर्घटनेमागील वस्तुस्थिती समोर येण्यासाठी आता अधिकृत चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या या प्रकरणी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे बंदर परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, “प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ चौकशीच्या घोषणा होतात, मात्र निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार?” असा संतप्त सवाल उरणकरांमधून विचारला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!