• Sun. Jun 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धन-आराठी मार्गावरील धोकादायक वडाचे झाड हटवण्याची मागणी; पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याची नागरिकांची हाक

ByEditor

Jun 14, 2026

​श्रीवर्धन | अनिकेत मोहित
श्रीवर्धन-आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत असलेले एक मोठे वडाचे झाड सध्या अत्यंत धोकादायक आणि कोलमडलेल्या अवस्थेत आहे. हे झाड कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने येथील प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी पावसाळा लक्षात घेता, प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हे झाड तातडीने हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

​या मुख्य रस्त्यावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि वाहनांची सतत ये-जा सुरू असते. सध्या हे झाड एका बाजूला झुकलेले असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हे झाड कोसळल्यास मोठी जीवित किंवा वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

​चक्रीवादळाचा अनुभव; आधीच खबरदारी घेण्याची गरज

​श्रीवर्धन परिसराने यापूर्वी ‘निसर्ग’ चक्रीवादळासारख्या भयानक नैसर्गिक आपत्तीचा सामना केला आहे. किनारपट्टीचा भाग असल्याने येथे पावसाळ्यात प्रचंड वेगाने वारे वाहतात आणि मुसळधार पाऊस पडतो. अशा वातावरणात हे आधीच कोलमडलेले झाड केव्हाही उन्मळून पडू शकते. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा, प्रशासनाने आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

​प्रशासकीय उदासीनतेवर नाराजी

​स्थानिक नागरिकांकडून संबंधित ग्रामपंचायत, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या संदर्भात सातत्याने लक्ष वेधण्यात येत आहे. प्रशासनाने या जागेची तातडीने पाहणी करावी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे वडाचे झाड सुरक्षितपणे हटवावे, अशी तीव्र मागणी परिसरातील नागरिकांनी व प्रवाशांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!